दारू आणण्यास नकार दिल्याने पेट्रोल टाकून एकास पेटविले

 

Crime 21

जळगाव, प्रतिनिधी |  दारू आणण्यास नकार दिल्याचा राग येऊन तिघांनी दुचाकीच्या टाकीतून पेट्रोल काढुन ते एकाच्या अंगावर टाकून त्याला पेटवून दिल्याची खळबळजनक घटना रविवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास शहरातील इंद्रप्रस्थनगरात घडली. या घटनेत अनिल चोखा सोनवणे (४३) रा. इंद्रप्रस्थनगर बौध्द विहारजवळ) हे २५ टक्के भाजून जखमी झाले आहेत.

अनिल सोनवणे हे वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रविवारी मध्यरात्री सोनवणे हे घराबाहेर उभे होते. यावेळी त्याच परिसरात राहणाऱ्या छोटु सुरवाडे, विकास साबळे व आणखी एक तरुण (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) हे सोनवणेंजवळ आले. आपण शेकोटी करु असे सांगून त्यांनी सोनवणेंना दूध फेडरेशन परिसरातील बौद्ध विहाराजवळ आणले. या ठकाणी शेकोटी पेटवल्यानंतर सोबत आणलेल्या दारुच्या बाटल्या काढून सोनवणेंसह चौघांनी मद्यपान केले. काही वेळाने दारु संपली. यानंतर विकास याने सोनवणेंना पुन्हा दारु आणण्यास सांगितले. परंतु, थंडी वाजत असल्याने सोनवणे यांनी दारु आणण्यास नकार दिला. याचा तिघांना राग आला. तिघांनी शेजारी असलेल्या दुचाकीच्या टाकीतून बाटलीत पेट्रोल काढले. त्यानंतर सोनवणेंच्या अंगावर ओतले. ते शेकोटीजवळ बसलेले असल्यामुळे प्रचंड भडका होऊन भाजले गेले. या घटनेत सोनवणेंचे डोळे, मान, चेहरा, दोन्ही हात-पाय भाजले गेले. या थरार घटनेने गर्भगळीत झालेल्या तिघांनी याठिकाणाहून पळ काढला. प्रकार लक्षात आल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी जखमी सोनवणे यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना रात्रीतून खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने ही घटना शहर पोलिसांना कळवली. यानंतर सोनवणे यांनी दिलेल्या जबाबावरुन तीघांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content