एटीएम फोडणारे फरार आरोपी अखेर पुन्हा अटकेत

जळगाव प्रतिनिधी । जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यातून हरियाणा पोलिसांना स्थलांतरीत करण्याआधी पळ काढणार्‍या दोन एटीएम चोरट्यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलाच्या अलीकडे स्टेट बँकेची शाखा आहे. याच्या बाहेर एक एटीएम सेंटर आहे. त्यात कॅश भरणा आणि एटीएम अशी दोन एटीएमची मशीन आहेत. १२ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हे दोन्ही एटीएम तोडण्यात आले. यात संबंधीत एटीएम हे गॅस कटरने तोडून चोरट्यांनी यामध्ये असणारी १४ लाख ४१ हजार रूपयांची कॅश लांबवून पोबारा केल्याचे स्पष्ट झाले होते. तर या एटीएममध्ये असणारी सात लाख रूपयांची रोकड मात्र चोरट्यांना न दिल्याने सुरक्षित राहिली होती.

या प्रकरणी निसार सखू सैफी (वय ३९) व इरफान सखू सैफी (वय २९, दोघे रा.साफेता, ता.गणपूर, हरियाणा) अशा दोन आरोपींना हरियाणा पोलिसांनी अटक केली होती. हे दोघे सख्खे भाऊ आहेत. तर कुर्शीद मदारी सैफी (वय ३७, रा.अंघोला हतीम, पलवल, दिल्ली) हा मास्टर माइंड मात्र अटक होण्याआधी पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

जळगावातील एटीएम चोरीचा तपास पूर्ण करून त्यांना हरियाणा राज्यातील निमका येथील कारागृहात पोहचवण्यात आले. यासाठी जिल्हापेठचे एक पथक या दोन्ही आरोपींना घेऊन गेले होते. स्थानिक कारागृह प्रशासनाने त्यांची कोविड टेस्ट करून मगच जेलमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश दिले. या अनुषंगाने दोन्ही आरोपींना घेऊन पोलीस पथक एका हॉटेलमध्ये राहिले. तेथूनच या दोन्ही आरोपींनी पळ काढला. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली होती.

या घटनेनंतर हरियाणातील पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलीस त्यांच्या मागावरच होते. अखेर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास या दोघांना फरीदाबात शहरातून अटक करण्यात आली आहे. यामुळे अर्थातच जिल्हापेठ पोलीस पथकाचा जीव भांड्यात पडला आहे.

Protected Content