मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता १०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होईल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
या वर्षीची दहावीची परीक्षा करोना प्रादुर्भावाचा विचार करुन रद्द करण्यात आली होती. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन पद्धती जाहीर करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी म्हणजे २०२१ साली एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेस पात्र ठरले. त्यापैकी ९ लाख ९ हजार ९३१ मुलं असून मुलींची संख्या ७ लाख ४८ हजार ६९३ इतकी आहे. एकूण आठ माध्यमांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे अंतर्गत गुणांच्या साहाय्याने करण्यात आलं आहे. १०० गुणांच्या मूल्यमापनामध्ये ५० गुण हे या विद्यार्थ्यांच्या नववीच्या गुणांच्या साहाय्याने दिले जातील. तर उरलेले ५० गुण हे दहावीच्या मूल्यमापनावर आधारित असतील. विद्यार्थ्यांना जर मिळालेले गुण समाधानकारक वाटत नसतील तर करोना प्रादुर्भाव संपल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे.