चोपडा (प्रतिनिधी) येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात पंचायत समिती चोपडा व सलाम मुंबई फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय तंबाखूमुक्त कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. यावेळी १४ नोव्हेंबर पर्यंत तंबाखूमुक्त शाळा करण्याचा संकल्प करण्यात आला.
दोन सत्रात झालेल्या या कार्यशाळेत तालुक्यातील सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक , आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांना कार्यशाळेचे तज्ञ मार्गदर्शक योगेश चौधरी, संजय बारी, इरफान खान यांनी मार्गदर्शन केले. तंबाखूमुक्त शाळेसाठी पूर्ण करावयाचे ११ निकष, विद्यार्थी, शिक्षक, पालक, समाजाची भूमिका, तंबाखूचे होणारे दुष्परिणाम याची माहिती दिली. तसेच उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी सर्वांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली.
कार्यशाळेस तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, विस्तार अधिकारी सूमित्र अहिरे, सुधाकर गजरे, सर्व केंद्रप्रमुख, राज्य तंबाखुमुक्त समितीचे जिल्हा सल्लागार डॉ. नितीन भारती, सलाम बॉम्बे फाऊंडेशन चे जिल्हा समन्वयक जयेश माळी, जनमानवता बहुद्देशीय संस्थेचे राज मोहम्मद शिकलगार हे मंचावर उपस्थित होते. डॉ. भावना भोसले, सुमित्र अहिरे, नरेंद्र सोनवणे यांनी प्रशासकीय बाबींविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.