मुक्ताईनगर (प्रतिनिधी) भूजल पातळीत झपाट्याने घट होत असून त्यावर तात्काळ उपाय योजना करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ असा मोलाचा संदेश देत तालुक्यातील सुकळी माध्यमिक विद्यालयातर्फे घरोघर जाऊन अभिनव असे अभियान राबवण्यात येत आहे. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पाणी बचतीचा संदेश ते कृतीद्वारा आत्मसात करीत आहेत. या उपक्रमाचे तालुका भरातून कौतुक होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याने तालुक्यात २०१६ साली ७१३ मिलिमीटर २०१७ साली ५३७ किलोमीटर तर २०१८ साली ३५७ मिलिमीटर अशा वेगाने पर्जन्यमान घटत आहे. ही बाब तालुक्यासाठी अत्यंत धोकादायक आहे, इतकेच नव्हे तर भूजल पातळीतही दर सहा महिन्यांनी १० ते साडे दहा फूट घट होत आहे. हा निसर्गाने दिलेला इशारा असून आताही जनता जागृत झाली नाही तर तालुक्यात वाळवंट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी वृक्षलागवड करणे पाण्याचा अपव्यय थांबवणे सांडपाण्याचा निचरा शोष खड्डामध्ये करणे, असे विविध उपाय सर्वांनी करावे. कारण पाणी तयार करता येत नाही त्यामुळे सजीवांचे अस्तित्व टिकवायचे असेल तर पाणी वाचवणे, वृक्ष वाचवणे, पर्यावरण वाचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असा संदेश तालुक्यातील टाकळी येथील रामदेवबाबा बहुउद्देशीय संस्था व सुकळी येथील नवीन माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त संकल्पनेतून व आयोजनातून देण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या महाराष्ट्र दिनापासून ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. सदर अभिनव उपक्रम गेल्या चार दिवसांपासून सतत सुरू आहे. ही संकल्पना संस्थेचे सचिव डॉ. दिलीप पानपाटील यांनी सुचवली असून सुकळी येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप दाणे, उपशिक्षक दत्तात्रय फेगडे, शरद बोदडे, शरद चौधरी, श्रीमती वैशाली सोनवणे, राजेंद्र वाघ, विशाल काकडे, मंगेश दांडगे, संदीप पावरा, मयूर सपकाळे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी नवल कोळी, सतीश सोनवणे, अनिल चौधरी हे नागरिकांच्या घरापर्यंत जावून भेटी घेत आहेत. या अभियानाची सुरुवात तालुक्यातील वायला या गावापासून करण्यात आली असून त्यानंतर महालखेडा, टाकळी, नांदवेल, डोलारखेडा, सुकळी, सोमनगाव आणि दुई अशा गावांमध्ये संदेश पोहोचविण्यात आला आहे. या उपक्रमाचे तालुका भरातून कौतुक केले जात आहे. असे उपक्रम शासनानेही हाती घ्यावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
वायला येथे पोलीस पाटील सुनील तायडे, बाजीराव कोळी यांचेसह नागरिकांनी सहभाग नोंदविला.नांदवेल येथे जि प सदस्य निलेश पाटील यांनी सपत्नीक या अभियानात सहभाग नोंदवला. तसेच पोलीस पाटील, अनिल वाघ, मुरलीधर पाटील, गजानन सुरवाडे, नंदू वाघ, दीपक वाघ, जि प शिक्षक हिरोळे, यांनीही सहभागी होऊन जल बचतीचा संदेश दिला.
महालखेडा येथे पोलीस पाटील राजू वाघ, ग्रामपंचायत सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच तसेच सेवानिवृत्त शिक्षक गुणवंतराव वाघ यांनी सहभाग नोंदवला. टाकळी येथे संस्थेचे संचालक रसालभाऊ चव्हाण यांनीही सहभाग नोंदवला. सुकळी सोमनगाव येथे सरपंच श्रीमती कांताबाई पाटील तसेच पंचायत समिती सदस्य विकास समाधान पाटील, पोलीस पाटील संदीप इंगळे, कडू महाराज, विनोद डापके, भाऊलाल पाटील, माजी सरपंच बाजीराव सोनवणे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनीता कोळी, माजी सरपंच भगवान धनगर, देवानंद चव्हाण, वामन कोळी, रघुनाथ कोळी, निसर्ग कृषी केंद्राचे संचालक दादाराव नामदेव पाटील, प्रफुल्ल पाटील, वीरेंद्र पाटील, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक गाजरे, यांनीही मोलाचे सहकार्य केले.
दुई येथे वसंत तळेले, सरपंच संदीप जावळे, माजी सरपंच जुलाल पाटील, राजेंद्र पाटील, मुरलीधर फेगडे, यांच्यासह सुकळी येथील जि प शाळेचे मुख्याध्यापक ई.ओ. पाटील यांनीही अभियानात सहभाग नोंदवला.डोलारखेडा येथे पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ सुरेश इंगळे, विनोद इंगळे, माजी सरपंच पुंडलिक वालखड, ग्रामपंचायत सदस्य माणिक बिल्डर सोनार, समाधान थाटे, मारुती कोळी यांनीही मोलाचे सहकार्य केले.