मुक्ताईनगरच्या प्रभाग १३ मधील नागरिकांना सहन कराव्या लागताय नरक यातना !

Muktainagar मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये सध्या नागरिकांना अक्षरश: नरकयातना भोगाव्या लागत असून स्थानिक नगरसेवक आणि प्रशासन कुंभकर्णी झोपमध्ये असल्याने आता दाद मागावी तरी कुणाकडे असा संतप्त सवाल परिसरातील लोक विचारत आहेत.

सध्या पावसाळ्यामुळे सगळीकडेच रस्त्यांच्या दुर्दशेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र तुलनाच करायची झाल्यास मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये असुविधांचा अगदी कळस गाठला गेल्याचे दिसून येत आहे. येथील रस्त्याच्या मध्यभागी पाणी साचले असल्याने येथू वाहने तर सोडाच पण पायी चालणे देखील जिकरीचे झाले आहे.

एकीकडे पावसाळ्यात साथीच्या रोगांसंदर्भात प्रत्येक भागात लक्ष देत असताना या प्रभागात नगरसेवकांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात असणार्‍या रेणुका माता मंदिराच्या वरदडीच्या रस्त्यात तर अक्षरशः पाण्याचे डबके साचले असल्याने तेथून चालणे देखील मुश्कील झाले आहे. त्या भागात जास्त क्लासेस असल्यामुळे विद्यार्थ्यांना पायी चालणे व सायकलवरून चालणे धोक्याचे झाले आहे विद्यार्थी रोज तेथून चिखलामध्ये पडत आहेत. साई मंदिरासमोर पाण्याचा हौद साचला असून मोठ्या प्रमाणावर डास तयार झालेले आहेत. एवढेच नव्हे तर प्रभागात असलेल्या अंगणवाडीत जावे कुठून? इतपत चार बाजूंनी पाणी साचलेले आहेत. प्रभागात मोठ्या प्रमाणावर गवत वाढले असून भर दिवसा मोठे साप ह्या भागात वावरताना दिसतात. परिसरात सर्वत्र गटारी तुडुंब भरले असून किती तरी वर्ष झाले गटारींचे सफाई झालेली नाही.

दरम्यान, पावसाळा सुरू असतांनाही या भागात पाण्याचा प्रश्‍न अतिशय गंभीर असा झालेला आहे. येथे पिण्याचे पाणी तर भेटतच नाही. तर अनेक नागरिकांना दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी अडचणी येत असल्याचे दिसून येते. एक आठवड्यापासून नळाला पाणी आले नसल्याने लोक संतप्त झाले आहेत. या परिसरात मूलभूत प्रश्नांच्या एवढ्या समस्या आहेत की आपण पाषाण युगात तर जगत नाही आहोत? असा प्रश्न नागरिक एकमेकांना विचारत आहेत. तरी प्रशासन आणि नगरसेवकांनी जागृत होऊन काम करावे अशी मागणी आता करण्यात येत आहे.

Protected Content