अजित पवार देणार काकांना धोबीपछाड : राष्ट्रवादीत उभी फूट अटळ !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अजित पवार यांनी शरद पवारांना दिलेला अल्टीमेटम संपल्यानंतर त्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला असून राष्ट्रवादीत उभी फूट पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेमध्ये उभी फूट पडून राज्यात सत्तांतर घेतले. यानंतर अनेकदा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि सत्ताधार्‍यांमध्ये अघोषीत सलोखा असल्याचे दिसून आले. अलीकडेच शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आपल्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी अचानक राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रसंगात देखील अजित पवार यांनी ताठर भूमिका घेतल्याचे दिसून आले होते. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थता सुरू असल्याचे दिसून येत आहे. विशेष करून अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याने चर्चेला उधाण आले. तर, त्यांना प्रदेशाध्यक्षपद हवे अशी देखील माहिती समोर आली होती. या अनुषंगाने आज अजित पवार यांच्या निवासस्थानी पक्षातील त्यांच्या समर्थक आमदारांची बैठक झाली.

या बैठकीत दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आदी ज्येष्ठ नेत्यांसोबत पक्षाचे सुमारे २० आमदार उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत चर्चा सुरू असून यात अजितदादा समर्थकांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेण्याबाबत चर्चा केली.

दरम्यान, आता या क्षणाला अजित पवार हे आपल्या समर्थकांसह निवासस्थानावरून बाहेर पडले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील राजभवनाकडे रवाना झाले आहेत. यामुळे अजित पवार हे तातडीने शपथविधी घेण्याची शक्यता बळावली आहे.

Protected Content