अजित पवार यांनी तडका-फडकी दिला आमदारकीचा राजीनामा

images 14

मुंबई, वृत्तसंस्था | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांचा राजीनामा मंजूरही करण्यात आला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी फोनही बंद ठेवल्याने राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीला अवघा एक महिना बाकी असतानाच अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्याचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात पूरग्रस्तांच्या दौऱ्यावर गेलेले असतानाच अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा न करताच अजित पवार यांनी हा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पक्षातील कोणत्याही नेत्याला त्यांनी राजीनाम्याची पूर्वसूचना दिली नसल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे. शिवाय पक्षांतर्गत कुरबुरींमुळेही त्यांनी राजीनामा दिला असावा, असा कयास वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शिखर बँक घोटाळ्यातही अजित पवार यांच नाव आल्यानेही त्यांनी राजीनामा दिला असावा असेही सांगण्यात येते.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही अजित पवार यांनी विधीमंडळाच्या कार्यलयात येऊन माझ्या पीएकडे राजीनामा दिला. तसेच मला फोन करून राजीनामा मंजूर करण्याची विनंती केल्याचे सांगितले. राजीनामापत्रात त्यांनी कोणतेही कारण दिलेले नाही. तसे कारणही दिले जात नसते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते मुंबईत दाखल झाले होते, मात्र अजित पवार हे मुंबईत आले नव्हते. त्यावरही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Protected Content