जळगाव प्रतिनिधी । निवडणुकीच्या काळात अभिवचन दिल्यानुसार आज वाघनगर आणि परिसरातील जनतेला वाघूर धरणाचे पाणी आणि ते देखील अद्ययावत पध्दतीने शुध्द करून पुरवठा केल्याचे आत्मीक समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. वाघनगर पाणी पुरवठा योजनेचे अतिशय साध्या कार्यक्रमात उदघाटन करतांना ते बोलत होते. आजपासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली असल्याने सुमारे ३० हजार नागरिकांनी पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी मिटली आहे.
वाघनगरसह परिसरातील कॉलन्या या महापालिका हद्दीत असल्या तरी त्यांचा समावेश जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात होतो. या भागात सुमारे ३० हजार नागरिक राहत असून अद्यापही येथे महापालिकेने पाणी पुरवठा यंत्रणा उभारलेली नाही. परिणामी या भागातील लोकांना पाण्यासाठी विहिर, कुपनलीका आणि टँकर आदींवर अवलंबून रहावे लागते. या भागाची समस्या लक्षात घेऊन ना. गुलाबराव पाटील यांनी सहकार राज्यमंत्री असतांना २७ फेब्रुवारी २०१७ रोजी वाघूर धरणावरून या भागात थेट पाणी पुरवठा करण्याच्या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळवून दिली होती. यानंतर १० ऑक्टोबर २०१० रोजी वाघूर धरणातील पाणी वाघनगर योजनेसाठी आरक्षीत करण्याच्या निर्णयाला मान्यता मिळाल्यानंतर या योजनेच्या कामाला गती मिळाली. या पाणी पुरवठा योजनेसाठी २६ मार्च २०१८ रोजी वर्कऑर्डर निघाली.
वाघूर धरणातल्या जॅकवेलमधून थेट वाघ नगरात पाणी आणण्यासाठी कंडारी, उमाळा, रायपूर, कुसुंबा, मेहरूण आदी शिवारांमधून २६.६५ किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. यात कंडारी ते उमाळा दरम्यानचा थोडा भाग हा वन खात्याच्या अंतर्गत येत असल्याने येथून पाईपलाईन टाकण्यासाठी खूप अडचणी आल्या. या पाणी पुरवठा योजनेमध्ये वाघूर धरणाच्या काठावर जॅकवेल खोदण्यात आलेली आहे. येथील पाणी उमाळा येथील टाकीमध्ये आणले जाते. येथून महामार्गाच्या बाजूने पाईपलाईनच्या मदतीने हे पाणी नवीन रायपूर येथील ब्रेक प्रेशर टँक (बीपीटी) या प्रकारातील टाकीत आणले आहे. येथून याच प्रकारातील दौलतनगर भागात असणार्या टाकीमध्ये हे पाणी आणले जाते. येथून कोल्हे हिल्स परिसरात असणार्या जलशुध्दीकरण प्रकल्पात हे पाणी येते. या ठिकाणी शास्त्रीय पध्दतीत पाणी शुध्द करून ते मुंदडा हिल येथे असणार्या टाकीत नेण्यात आले असून येथूनच खालील बाजूस असणार्या वाघनगर आणि परिसरातील वस्तीला येथून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत या योजनेला प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी पालकमंत्र्यांनी आज या योजनेच्या माध्यमातून आपण निवडणुकीच्या कालखंडात दिलेल्या अभिवचनाची पूर्तता होत असल्याचे सांगितले. या भागातील जनतेला शुध्द पाणी मिळणार असल्याचा आपल्याला आत्मीक आनंद झाला असून भविष्यातही या परिसरातील जनतेच्या विविधांगी विकासासाठी आपण वचनबध्द असल्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले.
केंद्रीय समिती जिल्ह्यात दाखल असल्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी या महत्वपूर्ण अत्यावश्यक सेवेच्या महत्वपुर्ण अश्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी ना. जि, प अध्यक्षा सौ. रंजनाताई पाटील आमदार राजूमामा भोळे, पं. स. सभापती नंदलाल पाटील, जि.प . सदस्य पवन सोनवणे, नगरसेवक गणेश सोनवणे, संतोष पाटील, माजी सरपंच तथा नगरसेविका उषाताई पाटील, मजि प्रा चे कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, सहायक अभियंता एस. व्ही. चौधरी, उप अभियंता बी. जी. पाटील, शाखा अभियंता एन बी चौधरी व कॉन्ट्रॅक्टर गणेश चव्हाण, आर. जी. राजपाल आदी उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार राजुमामा भोळे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानून या भागातील रस्त्यांचा विषय मार्गी लावण्याची मागणी केली. जिल्ह्यातील कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोणताही बडेजाव पणा न करता केवळ १५ – २० लोकांच्या उपस्थितीत सर्व नियमांचे पालन करूनच पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. जी. राजपाल यांनी केले तर मजिप्रा चे कार्यकारी अभियंता एस. सी. निकम यांनी केले. १९ कोटींची योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी अनेक तांत्रीक बाबींची अडचणींवर सामना करावा लागला मात्र पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या खंबीर साथी मुळे योजना यशस्वी झाल्याचे सांगितले.