Home आरोग्य शाहू नगरातून डासांविरोधातील विशेष मोहीम सुरू; महापालिकेकडून धुरळणी, फवारणी आणि लार्विसाइडिंगला वेग

शाहू नगरातून डासांविरोधातील विशेष मोहीम सुरू; महापालिकेकडून धुरळणी, फवारणी आणि लार्विसाइडिंगला वेग

0
3


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या डासजन्य रोगांचा वाढता धोका लक्षात घेऊन जळगाव शहर महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती दिली आहे. महापालिकेच्या मलेरिया विभागामार्फत शहरभर धुरळणी (फॉगिंग), कीटकनाशक फवारणी आणि लार्विसाइडिंगची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली असून, या मोहिमेचा शुभारंभ सोमवारी शाहू नगर या दाट लोकवस्तीच्या परिसरातून करण्यात आला. Special campaign against mosquitoes starts in Shahu Nagar; Municipal Corporation accelerates dusting, spraying and larviciding

मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात शाहू नगर परिसरात चार धुरळणी यंत्रांच्या साहाय्याने फॉगिंग करण्यात आले. पावसाळ्यात या भागात पाणी साचण्याची शक्यता आणि दाट लोकवस्तीमुळे डासांची वाढ होण्याचा धोका लक्षात घेऊन या परिसराची निवड करण्यात आली. आगामी काही दिवसांत नियोजित वेळापत्रकानुसार शहरातील सर्व प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने धुरळणी, कीटकनाशक फवारणी आणि लार्विसाइडिंगची कामे राबविण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या मलेरिया विभागाने या मोहिमेसाठी आवश्यक मनुष्यबळ, धुरळणी यंत्रे आणि रासायनिक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, नाले, गटारे, पाणी साचणारी ठिकाणे, दाट लोकवस्तीचे भाग तसेच डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असलेल्या परिसरांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

डासांच्या अळ्यांचा नाश करण्यासाठी लार्विसाइड रसायनांचा वापर केला जात असून, प्रौढ डासांचे प्रमाण कमी करण्यासाठी नियमित फॉगिंग आणि कीटकनाशक फवारणी केली जाणार आहे. या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया तसेच इतर डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होणार असल्याचा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

महानगरपालिका आयुक्तांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, पावसाळ्यात डासजन्य रोगांचा धोका वाढत असल्याने सर्व प्रभागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने धुरळणी, फवारणी आणि लार्विसाइडिंगची कामे केली जातील. नागरिकांनी घराच्या व परिसरात पाणी साचू देऊ नये, स्वच्छता राखावी आणि महानगरपालिकेच्या मलेरिया विभागास आवश्यक ते सहकार्य करावे.

याशिवाय घराभोवती किंवा छतावर अनावश्यक पाणी साचू न देणे, पाण्याच्या टाक्या व भांडी झाकून ठेवणे, आठवड्यातून एक दिवस ‘ड्राय डे’ पाळणे तसेच डासांची पैदास होऊ शकणाऱ्या टाकाऊ वस्तूंची त्वरित विल्हेवाट लावणे, अशा उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहनही महापालिकेच्या मलेरिया विभागाने केले आहे.

पावसाळ्यात डासजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने शहरव्यापी मोहीम सुरू केली असून, नागरिकांच्या सहभागातून ही मोहीम अधिक प्रभावी ठरणार आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबत नागरिकांनीही आवश्यक खबरदारी घेतल्यास डासजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत होणार आहे.

 


Protected Content

Play sound