Home आरोग्य जीवघेण्या डायबेटिक किटोअॅसिडोसिसवर मात; १० वर्षीय बालिकेला महादेव रुग्णालयात नवजीवन

जीवघेण्या डायबेटिक किटोअॅसिडोसिसवर मात; १० वर्षीय बालिकेला महादेव रुग्णालयात नवजीवन

0
7


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  गंभीर अवस्थेत बेशुद्ध झालेल्या १० वर्षीय बालिकेवर महादेव सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ आणि अतिदक्षता विभागाच्या डॉक्टरांनी वेळेत उपचार करून तिचे प्राण वाचविण्यात यश मिळविले. डायबेटिक किटोअॅसिडोसिस (DKA) या जीवघेण्या आजाराचे वेळेत निदान झाल्याने बालिका पूर्णपणे धोक्याबाहेर आली असून तिला सुखरूप घरी सोडण्यात आले.

अचानक प्रकृती बिघडून बेशुद्ध झालेल्या बालिकेला तातडीने महादेव सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान तिला आकडी (फिट्स) येऊ लागल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. तत्काळ रक्त तपासण्या व इतर वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये तिला डायबेटिक किटोअॅसिडोसिस हा गंभीर आजार असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयातील बालरोग व अतिदक्षता विभागाच्या टीमने तातडीने उपचार सुरू करत बालिकेला अतिदक्षता विभागात दाखल केले. वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार इन्सुलिन थेरपी, द्रवोपचार, इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखणे तसेच सतत रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब, श्वसन आणि हृदयाच्या गतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. काही दिवसांच्या उपचारानंतर बालिकेच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आणि ती पूर्णपणे शुद्धीवर आली.

या उपचारामध्ये डॉ. सिद्धांत घोलप, डॉ. सुनील पाटील, डॉ. कुशल धांडे, डॉ. ओमश्री गुडे, डॉ. अस्मिता गायकवाड, डॉ. निशीगंधा सोनुने, डॉ. नावेद खान, डॉ. सृष्टी भिरूड, डॉ. मिमोनी कुंभारे आणि डॉ. विशाल कोठावले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तज्ज्ञांच्या मते, डायबेटिक किटोअॅसिडोसिस ही मधुमेहाची गंभीर गुंतागुंत असून मुलांमध्ये ती जीवघेणी ठरू शकते. सतत तहान लागणे, वारंवार लघवी होणे, वजन  झपाट्याने कमी होणे, उलट्या, अशक्तपणा किंवा बेशुद्धावस्था अशी लक्षणे आढळल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 


Protected Content

Play sound