बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रोटरी क्लब खामगांव आपल्या सदस्यांचे व्यक्तिमत्व विकास व्हावे किंवा त्यांना जगात सुरु असलेल्या विविध घडामोडींची माहिती व्हावी या उद्देशाने साधारणतः प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे वर्षातून १२ ते १५ स्पीकर मिटींगचे आयोजन करीत असते. यामध्ये स्थानिक पातळीवरील विषयांपासून ते जागतिक स्तरावरील विषयांपर्यंतचे विविध मुद्दे समाविष्ट केल्या जातात. या अंतर्गत रविवारी रोजी सकाळी सुरजदेवी मोहता महिला महाविद्यालयात ‘बीमा सर्वेक्षण’ या विषयावर आधारीत अशाच एका स्पीकर मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळेस सुप्रसिद्ध बीमा सर्वेक्षक कमल चांडक (खामगांव) यांनी ‘अग्नि व समुद्री बीमा सर्वेक्षण’ या विषयावर उपस्थित रोटरी सदस्यांना मार्गदर्शन केले. त्यांचेनंतर सुप्रसिद्ध बीमा सर्वेक्षक नरेंन्द्र खत्री (अकोला) यांनी ‘मोटर व पारगमन बीमा सर्वेक्षण’ या विषयावर उपस्थित रोटरी सदस्यांना विस्तृत माहिती दिली. दोन्ही तज्ञ वक्त्यांनी उपस्थित रोटरी सदस्यांना मार्गदर्शित करण्यासोबतच त्यांच्या अनेक शंकांची समाधानकारक उत्तरे देवुन सर्वांना या क्षेत्रातील त्यांना असणा-या अगाढ ज्ञानाचे प्रदर्षन घडविले. दोन्ही तज्ञ अत्यंत अनुभवी असल्यामुळे त्यांनी बरेचसे मुद्दे सदस्यांना केस स्टडीजव्दारे समजावुन सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री कमल चांडक यांचा परिचय रो विजय पटेल यांनी करुन दिला तर नरेंन्द्र खत्री यांचा परिचय रो निशांत गांधी यांनी करुन दिला.
कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन अध्यक्ष रो सुरेश पारीक यांनी स्वतः केले. यावेळेस सुमारे ५० रोटरी सदस्यांची उपस्थिती सदर कार्यक्रमाला लाभली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व रोटरी सदस्यांनी परिश्रम घेतले.