महाराष्ट्रात मराठीतच बोला : राज्यपालांनी जिंकली मराठी जनांची मने !

यवतमाळ | ‘हा महाराष्ट्र असून आपण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठीतच करा…मराठीतच बोला’ अशा सूचना जाहीरपणे देऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले मराठी प्रेम दाखवून दिले आहे. त्यांच्या या मराठी प्रेमावरून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी काही दिवसांमध्येच मराठी शिकून घेतली. बर्‍याच कार्यक्रमांमध्ये ते आता मराठीतूनच भाषण करत असल्याचे दिसून आले आहे. यातच आता यवतमाळ येथील कार्यक्रमातील त्यांची भूमिका ही सोशल मीडियात कौतुकाचा विषय बनली आहे.

यवतमाळमध्ये स्वातंत्र्यसैनिक तथा माजी मंत्री जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आमंत्रीत करण्यात आले होते. याप्रसंगी निवेदकाने इंग्रजी सूत्रसंचालन सुरू करताच राज्यपालांनी त्याला थांबविले. हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमामंध्ये मराठीतचं सूत्रसंचालन व्हायला पाहिजे, अशी आग्रही भऊमिका राज्यापालांनी मांडली. मराठी भाषा ही मातृभषा आहे याचं भान राखलं पाहिजे, राज्यात सर्वत्र मराठी भाषा अनिवार्य असली पाहिजे, असंही ते म्हणाले. मराठी ही भाषा संस्कृत आणि हिंदी प्रमाणेच गोड असल्याच सांगितलं. मराठी भाषा सरळ, साधी आहे. मराठीचं वाचन करु शकतो आणि समजू शकतो, असं देखील राज्यपाल म्हणाले.

राज्यपालांनी मराठी प्रेम दाखविल्याने आता त्यांचे अनेकांनी कौतुक केले आहे. वर्षानुवर्षे महाराष्ट्रात राहूनही हिंदी वा इंग्रजीत बोलणार्‍यांनी यापासून धडा घ्यावा ही अपेक्षा देखील आता व्यक्त करण्यात येत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!