‘ट्रॅजेडी क्विन’वर बनणार वेब सेरीज; लवकरच चित्रीकरण

मुंबई । आपल्या शोकात्म भूमिकांसाठी ख्यात असणार्‍या मीना कुमारीच्या जीवनावर लवकरच वेब सेरीज येणार असून याच्या चित्रीकरणास येत्या काही दिवसांमध्ये प्रारंभ करण्यात येणार आहे.

हिंदी सिनेमाची शोकांतिका क्वीन म्हणून ओळखल्या जाणारी दिग्गज दिवंगत अभिनेत्री मीना कुमारीचे आजही असंख्य चाहते आहेत. अगदी अल्पायुष्य लाभलेल्या या ‘ट्रॅजेडी क्विन’च्या जीवनावर लवकरच वेब सेरीज येणार आहे. प्रभुलीन कौर या याच्या निर्मात्या असतील. प्रभूलीन यांनी अलीकडेच मीना कुमारीच्या जीवनावर आधारित असणार्‍या अश्‍विनी भटनागर यांनी लिहलेल्या ‘मेहजबीन अ‍ॅज मीनाकुमारी’ या पुस्तकाचे हक्क विकत घेतले आहेत. याच पुस्तकाच्या कथानकावर आधारित ही वेब सेरीज असणार आहे.

प्रभुलीन कौर यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. त्या म्हणाल्या की, माझ्यासाठी हा प्रोजेक्ट म्हणजे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. मीना कुमारीच्या नावापेक्षा माझ्या आयुष्यापेक्षा सुंदर माझ्यापेक्षा काहीच नाही. या वेब सेरीज मध्ये खरीखुरी माहिती यावी यासाठी आम्ही आम्ही हिंदी चित्रपट पत्रकारितेतील सर्वोत्कृष्ट लोकांना कामावर घेतले आहे. विशेष बाब म्हणजे वेब सेरीजनंतर याच कथानकावर चित्रपट बनविण्याचा मानस देखील त्यांनी बोलून दाखविला आहे.

मीना कुमारी या साहिब बीवी और गुलाम, पाकीजा, मेरे अपने, बैजू बावरा, दिल अपना और प्रीत पराई, दिल एक मंदिर, काजल अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमधील विलक्षण भूमिकांमुळे अजरामर झाल्या आहेत. ३१ मार्च १९७२ रोजी वयाच्या ३९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. अर्थात आजही त्यांच्या चाहत्यांची संख्या मोठी असल्याने ही वेबसेरीज त्यांच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे.

Protected Content