जळगाव, प्रतिनिधी | आज येथील बस स्थानकात दाखल झालेल्या एस.टी.च्या ‘वारी लालपरीची, गाथा नव्या युगाची’ या प्रदर्शनाला दिवसभर प्रवासी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गेल्या चार-पाच वर्षात एस.टी.चे रुपडे आणि सेवेत झालेला अमुलाग्र बदल लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या १ जून रोजी एस.टी. च्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त एका बसमध्ये आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन राज्याच्या ३६ जिल्ह्यातील प्रमुख ६० शहरात भेट देणार आहे. त्याची सुरवात मुंबई येथून झाली असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असा प्रवास करून ते आज जळगावात दाखल झाले आहे, खान्देशातून ते विदर्भात रवाना होणार आहे. एअर पोर्टच्या धर्तीवर बस पोर्ट, स्लीपर बस, विठाई सेवा व बसेसच्या बांधणीत केलेले आकर्षक बदल या प्रदर्शनात सादर केले जात आहेत. य अप्रदर्शनाचे संयोजक रोहित दिन्डे यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना ही माहिती दिली.