पुणे प्रतिनिधी | आजपासून राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे निम्मे क्षमतेने सुरू झाली असतांना लवकरच यासाठी पूर्ण क्षमतेची परवानगी देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. आज सकाळी बालगंधर्व नाट्यगृहात नटराज पूजन केल्यानंतर ते बोलत होते.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार आजपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृह तसेच अम्युझमेंट पार्कही सुरू करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज बालगंधर्व रंगमंदिरात नटराज पूजन करण्यात आले. यानंतर बोलतांना अजित पवार यांनी म्हटलं की, दिवाळीनंतर देखील कोरोना रुग्णांची संख्या अशीच कमी होत राहिली तर नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना शंभर टक्के प्रेक्षक क्षमतेची परवानगी देण्यात येईल. कलाकारांना कोरोना काळात खूप काही सहन करावं लागलं असल्याचं सांगत कलाकारांच्या मंडळाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असं आश्वासन देखील पवारांनी दिलं.
अजित पवार म्हणाले की, आधीच दीड वर्षे नाट्यगृहे बंद होती. त्यात नूतनीकरणासाठी पुन्हा बालगंधर्व बंद ठेवावे लागल्यास कलाकार आणखी अडचणीत सापडतील, असं पवार म्हणाले. कोल्हापूर आणि मुंबईतील चित्रपट सृष्टीत नवीन सुविधा देऊ, असेही अजित पवार म्हणाले.