लवकरच १००० महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ सुरु होणार 

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात प्रभावशाली होण्यासाठी, देशातील युवा पिढीने शिक्षणाबरोबरच कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज आहे. सध्या १०० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. लवकरच १००० महाविद्यालयांमध्ये हे केंद्र सुरू होणार आहेत. या उपक्रमाचा लाभ महाविद्यालयातील युवक आणि युवतींनी घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्रांना ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ असे नाव देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

‘मेघदूत’ या शासकीय निवासस्थानी, कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यातील १०० महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्रांच्या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त आयुक्त अनिल सोनवणे यावेळी उपस्थित होते. दृकश्राव्य प्रणालीद्वारे १०० महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राचार्य यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले आहे. हे धोरण राबवल्यामुळे देशात आमूलाग्र बदल घडतील. देशात प्रथम स्थानी येऊन आपली अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी मानव संसाधन विकासावर भर देण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील पात्र महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. ही गोष्ट अत्यंत आनंदाची आहे.” अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणी करून महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु केल्याबद्दल या विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे त्यांनी अभिनंदन केले.

उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, बदलते तंत्रज्ञान आणि जागतिक पातळीवर कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. हे लक्षात घेऊन युवक आणि युवतींना काळाशी सुसंगत असे आवश्यक कौशल्य प्रशिक्षण या केंद्रातून देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घ्यावा. कोणत्याही विषयाची पदवी प्राप्त करून चालणार नाही तर त्यासोबत विविध कौशल्य प्राप्त केले तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असेही ते याप्रसंगी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना कौशल्य प्रदान करून आत्मनिर्भर बनवण्याचे उद्दिष्ट आपल्या समोर ठेवले आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य विकास विभाग वेळोवेळी विविध उपक्रम राबवत असतो. आज महाविद्यालयीन शिक्षणासह विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्य मिळावे म्हणून आम्ही १०० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु केली आहेत. पुढील ३ महिन्यात राज्यातील विविध भागात १००० महाविद्यालयांमध्ये ही कौशल्य विकास केंद्रे सुरु होतील. राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात राहणाऱ्या युवकांना कौशल्य मिळावे, रोजगार मिळावा यासाठीच आम्ही तत्परतेन काम करत आहोत.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीकोनातून महाविद्यालयीन शिक्षणासह व्यावसायिक कौशल्य विकसित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रथम टप्यात ३५०० महाविद्यालयांमधून १०० महाविद्यालयांना निवडले आहे. टप्याटप्याने यामध्ये महाविद्यालयांचा अधिकाधिक सहभाग वाढवला जाईल. प्रत्येक कौशल्य विकास केंद्रातून किमान १५० युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून राज्यात किमान २०,००० युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल आणि त्यासाठी सुसंगत अभ्यासक्रमाची देखील निवड करण्यात येईल. येथील विद्यार्थ्यांना २% इतके अकॅडमीक क्रेडिट मिळणार असून नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे त्याचा भरपूर फायदा होणार आहे.

Protected Content