राज्यातील कोविड केअर सेंटर्समध्ये महिलांवर अत्याचार – फडणवीस

शेअर करा !

मुंबई । राज्यातील कोविड केअर सेंटर्स आणि इतरत्रही महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली असून सरकारने सुरक्षेचे एसओपी तातडीने तयार करावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्राच्या माध्यमातून केली आहे.

माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. यात म्हटले आहे की, राज्यातील कोविड सेंटर आणि इतरही ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून महिला सुरक्षेच्या विषयात राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच कोविड आणि क्वारंटाईन केंद्रात महिला सुरक्षेचे एसओपी तातडीने तयार करावेत, अशी मागणी यात करण्यात आलेली आहे.

या पत्रात पुढे म्हटले आहे की, राज्यातील महिलांवर वाढलेले अत्याचार, त्यांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना इत्यादींबाबत यापूर्वी सुद्धा पत्रव्यवहार केला होता आणि एसओपी तयार करण्याची मागणी केली होती. पण, त्यासंदर्भात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, त्यामुळे हे पुन्हा पाठवत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. याबाबत कोणतेही खबरदारी घेताना राज्यातील सरकार दिसत नाही. अन्य विषयांवर हिरीरीने बोलणारे, दिवसांतून अनेक वेळा टीव्हीवर येणारे चेहरे या विषयांवर साधा निषेध करताना सुद्धा दिसून येत नाही, हे आजचे वास्तव आहे. असंवेदनशीलतेचा हा कळस आहे, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

अलीकडच्या काळात पनवेल क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार (१७ जुलै), सिंहगड क्वारंटाईन सेंटरमध्ये सुरक्षा रक्षकाकडून विनयभंग (२० जुलै), पुण्यातील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये वॉर्डबॉयकडून विनयभंग, क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग (२० जुलै), इचलकरंजी क्वारंटाईन सेंटरमध्ये विनयभंग (१५ मे), नंदूरबारमध्ये वॉर्डबॉयकडून विनयभंग, चंद्रपूरच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये युवतीचा विनयभंग, मालाड येथे क्वारंटाईन सेंटरमध्ये विनयभंग, मिरा-भाईंदर येथील कोविड सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार, मानखुर्द येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बडनेरा येथे शासकीय लॅबमध्ये महिलेच्या गुप्तांगाचा स्वॅब घेणे अशा अनेक घटना यापूर्वीच्या पत्रात नमूद केल्या होत्या, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात लिहिले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!