जळगावचे सुपुत्र डॉ. सुरेश गोसावी बनले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू !

जळगाव-आशुतोष हजारे (एक्सक्लुझीव्ह फिचर ) | मूळचे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेले डॉ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी काल तीन कुलगुरूंची निवड जाहीर केली. यात डॉ रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तर डॉ. सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी तर डॉ. संजय घनश्याम भावे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, या तीन मान्यवरांपैकी डॉ. सुरेश वामनगीर गोसावी हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. जळगाव तालुक्यातील धामणगाव ये त्यांचे गाव. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे जळगावात झाले. जळगावच्याच नूतन मराठा महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. त्यांनी १९८८ मध्ये पुणे विभागाच्या भौतिकशास्त्र विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्यांनी १९९२ मध्ये एसपी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून अध्यापनाला सुरुवात केली. त्यानंतर १९९६ मध्ये पीएच.डी.चे शिक्षण पूर्ण केले. यानंतर १९९८ ते २००० या कालावधीत त्यांनी अमेरिकेत पोस्ट डॉक्टरल फेलोशिप पूर्ण केली. यानंतर २००४ साली ते पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात रूजू झाले. ते सध्या याच विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.

डॉ. सुरेश वामनगीर गोसावी यांच्या संशोधनाच्या विषयांमध्ये प्लाझ्मा पॉलिमरायझेशन वापरून लिथोग्राफी आणि नमुना हस्तांतरण, ड्राय इलेक्ट्रॉन बीम संश्लेषण, मल्टी-इलेक्ट्रॉन बीम लिथोग्राफी सिस्टम डिझाइन, नॅनोमटेरियल्स, नॅनोटेक्नॉलॉजी मायक्रो फ्लुइड क्स, सॉफ्ट लिथोग्राफी आदींचा समावेश आहे. त्यांच्या माध्यमातून एक संशोधक प्राध्यापक हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विराजमान झाला आहे. तर, त्यांच्याच माध्यमातून जळगावच्या एका सुपुत्राला अतिशय महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. ही अर्थातच, आपणा सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब होय.

तर, लक्षणीय बाब म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विराजमान झालेले डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी देखील आधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात काम केलेले आहे.

अभिमानास्पद झेप ! : संजय सपकाळे

धामणगाव सारख्या छोट्या गावातून प्रतिकूल परिस्थितीतुन संघर्ष करीत निव्वळ गुणवत्तेच्या जोरावर तेही भारतात नामांकित असलेल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ सुरेश गोसावी सरांनी घेतलेली झेप ही अभिमानास्पद बाब असल्याचे धामणगाव येथील रहिवासी व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कर्मचारी संजय सपकाळे यांनी व्यक्त केली आहे.

Protected Content