जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कर्जबाजाराला कंटाळून अमित जयरामदास माखीजानी (वय-४३, रा. समृद्धी अपार्टमेंट, आदर्शनगर) या उद्योजकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना बुधवारी १६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नांेद करण्यात आली आहे.
याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील आदर्श नगरात अमित माखीजानी हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. सुरुवातीला त्यांचा मेडीकलचा व्यवसाय होता, मात्र त्यांनी तो बंद करीत एमआयडीसी परिसरात कागदपासून तयार होणाऱ्या उत्पादनाची फॅक्टरी टाकली. त्यासाठी अमित माखीजानी यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. परंतु बँकेकडून कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावलेला होता. तसेच त्यांनी जप्तीची नोटीस देखील पाठविली होती. तेव्हापासून अमित माखीजानी हे तणावात होते. दरम्यान, आज बुधवारी १६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता त्यांनी घरातील बेडरुममध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. अमित हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्यांच्या कुटुंबियांना धक्काच बसला. त्यांच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला. त्यांनी मृतदेह उतरवून तात्काळ जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.