जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विश्व मंगल योग निसर्गोपचार केंद्रामध्ये स्नेह मिलनाच्या कार्यक्रमात हळदी कुंकवाच्या निमित्ताने आरोग्याचे वाण देण्यात आले. त्यावेळी सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर राजेश जैन यांनी योग, प्राणायाम व ध्यानाने मेंदूवर कसा परिणाम होतो, आजार कसे दूर होतात अगदी सहज सोप्या भाषेत सांगितले तसेच मनोकायिक आजार योगा प्राणायाम नियमित केल्याने कसे बरे होतात यावर सुध्दा मार्गदर्शन केले व उपस्थित महिलांचे शंका निरसनही केले.
त्यात योग प्रवेश, योग परिचय व निसर्गोपचार परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डॉ. राजेश जैन सरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगतही व्यक्त केले.
सुंदर वान देऊन आरोग्य मंत्र सुद्धा सखींना देण्यात आला. डॉ. राजेश जैन सरांचा परिचय योग शिक्षक सुनील गुरव, प्रास्ताविक संचालिका चित्रा महाजन यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा चौधरी व ओंकार प्रार्थना कविता चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगशिक्षिका सौ अर्चना गुरव, नेहा तळेले, वसुंधरा येवले, रश्मी शिरसाठे, कविता चौधरी, दिलीप महाजन यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता डॉ. राजेश जैन , योगशिक्षक सुनील गुरव व प्राचार्य दिलीप महाजन यांच्या भक्तिगितांनी करण्यात आली.