चाळीसगाव, प्रतिनिधी । गौताळा अभयारण्यातील शिवापूर शिवारात चक्क चंदनाचीच तस्करी केली जात असल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याची माहिती समोर आली असून वनाधिकारी गप्प का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
गौताळा अभयारण्याच्या पायथ्याशी शिवापूर हे गाव वसलेले आहे. या शिवारातील गायमुख रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर चंदनाच्या जिवंत झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली असून त्याची तस्करी करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चंदनाची बारीक-सारीक झाडांची कत्तल हि मशिनीच्या साहाय्याने करण्यात आली आहे. या अभयारण्यात जाण्यास सक्त मनाई असतांना चंदनाच्या झाडाचे तस्करी करणारी टोळीने मध्ये शिरकाव केलाच कसा? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. ह्या घटनेला सहा-सात दिवस उलटूनही अद्याप वनविभागाकडून कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. एकीकडे सरकार वृक्षलागवडीवर मोठ्या प्रमाणात खर्च करत असताना दुसरीकडे दिवसाढवळ्या जिवंत झाडांची कत्तल सर्रासपणे केली जात आहे. या दरम्यान वनाधिकारी हे झोपा काढत होते का? असा सवाल आता येथील स्थानिकांकडून केला जात आहे. याआधीही गौताळा अभयारण्यात अवैध्य वृक्ष तोड, वन्यजीवांची शिकारी, गारगोटी तस्करी, वाळू तस्करी आदी गोष्टी घडल्या आहेत. परंतु वनविभागाकडून फारश्या प्रमाणात कारवाई करताना आढळून आलेले नाही. त्यामुळे हे अपप्रकार लवकरात लवकर बंद करून आरोपींना कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणीही स्थानिकांनी केली आहे.