
पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील लाडशाखीय वाणी समाज मंडळाच्या वतीने पारंपरिक श्रद्धा आणि भक्तिभावाने युक्त असा श्री सोळा कुलस्वामीनी माता छप्पन भोग नैवेद्य व महाप्रसाद सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी समाज मंगल कार्यालयात पार पडलेल्या या भव्य धार्मिक सोहळ्यात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून अध्यात्मिकतेचा सुंदर अनुभव घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता नव्याने साकारलेल्या सोळा कुलस्वामीनी मातांच्या देवघराच्या जलाभिषेकाने झाली. या पूजन विधीत १६ जोडप्यांनी सहपत्नीक जलाभिषेक करत मातेचं विधीवत पूजन केलं. यावेळी माजी संचालक तथा समाज मंडळाचे विद्यमान संचालक दीपक मधुकर पिंगळे आणि चंद्रकला पिंगळे यांनी सहपत्नीक प्रमुख पूजन केलं. या विशेष कार्यक्रमात समाज संचालक मंडळ व अन्य मान्यवरही सहभागी झाले होते.
सायंकाळी आयोजकांनी सिद्धपीठ चिंचवे गाळणचे प.पू. महंत पंकजजी बाबा नेरकर यांना विशेष निमंत्रण दिलं होतं. त्यांनी आपल्या उपस्थितीत संत विचारदास महाराज यांची प्रतिमा भेट दिली. गाळण येथे येत्या २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या संत उत्सवासाठी त्यांनी समाजबांधवांना आवाहन केलं. या निमित्ताने योगेश दशपुते आणि संजय सोनजे यांनीही उपस्थितांना पुढील कार्यक्रमात सहभागासाठी प्रोत्साहित केलं.
कार्यक्रमाच्या सांस्कृतिक विभागात भक्तीगीतांनी एक वेगळीच रंगत आणली. कुलस्वामीनी माता व कानबाई मातेस अर्पण करण्यात आलेल्या गीतांनी वातावरण भक्तिमय केलं. प्रथमेश शेंडे, ऋषिकेश शेंडे, साधना वाणी, सुनील नावरकर, उमेश शेंडे, दीपक शिनकर सर, मनिष शेंडे, राजेंद्र गुरव, विद्या येवले, अर्चना मैंद, सुनिता भामरे, सुनंदा शेंडे, वसंत नावरकर, हेमलता चादवडे, डॉ. बाळकृष्ण आनंद शेंडे यांनी वाद्यसह भक्तिगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
रात्रीच्या सत्रात “माझ्या स्वप्नात आई आली, छप्पन भोग मागू लागली” हे गीत गायक प्रथमेश शेंडे व ऋषिकेश शेंडे यांनी सादर केलं, ज्यावर अनेकांनी उत्स्फूर्त नृत्य करत धार्मिक वातावरण आणखीनच रंगतदार केलं. महिलांनी सामूहिक मंत्रजप व कुलस्वामिनी मातेची गीते सादर करून भक्तिभावाने मनोभावे सहभागी होत परंपरेचे जतन केलं.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज मंडळाचे अध्यक्ष विजय नावरकर, उपाध्यक्ष हेमकांत मुसळे, सचिव महेंद्र कोतकर, संस्कृती महिला मंडळ अध्यक्षा प्रा. वर्षा पुरकर, उपाध्यक्षा रुणल कोतकर, सचिव वर्षा कोठावदे, खजिनदार दीपिका शेंडे तसेच नवयुवक मंडळाने अथक परिश्रम घेतले.



