सहा दिवसात ‘तान्हाजी’ चित्रपटाचा १०० कोटी गल्ला

Tanaji movie

 

मुंबई प्रतिनिधी । २०२० या नवीन वर्षातला पहिल्या महिन्यातील अभिनेत्री काजोल, अजय देवगण आणि सैफ अली खान स्टारर तान्हाजी- द अनसंग वॉरिअर सिनेमाने पहिल्याच आठवड्यात १०० कोटींचा गल्ला जमा केला आहे. फक्त सहा दिवसांमध्ये तान्हाजी या चित्रपटाने १०७.६८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्शने तान्हाजीच्या कमाईचे आकडे शेअर करत म्हटले की, ‘तान्हाजी १०० कोटींच्या क्लबमध्ये नाबाद कलेक्शन करत आहे. सिनेमाने सहाव्या दिवशी चौथ्या आणि पाचव्या दिवसाच्या तुलनेत जास्त कमाई केली. वीकडेमध्ये सिनेमा ज्याप्रकारे कमाई करत आहे, यावरून सिनेमाच्या कथेत किती ताकद आहे ते दिसते. सिनेमा लवकरच १५० कोटींची कमाईही करेल.’

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये तान्हाजी सिनेमा करमुक्त केला. यानंतर आता हरियाणामध्येही अजय देवगणचा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ करमुक्त करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झाले. मुख्यमंत्री लवकरच त्याबाबत घोषणा करतील, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्या तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी’ हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. तान्हाजी मालुसरे हे एक वीर योद्धा. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेची गाथा नव्या पिढीला कळावी, हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा, यासाठी तो करमुक्त करावा.

Protected Content