‘अनेक आरोप होतात, पण देशासाठी सहन करावे लागते’ – मोदी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । ‘देशाला संकटातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थात, हे सगळं सोपे नाही. देशहिताचे निर्णय घेताना खूप काही सहन करावे लागते. माझ्यावर अनेक आरोप होतात. पण देशासाठी करावे लागते,’ असे सूचक उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काढले. दिल्लीतील विज्ञान भवनात ‘असोचेम’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

सुधारीत नागरिकत्व कायद्याला (CAA) देशभरात विरोध सुरू असताना पंतप्रधान मोदी आज ‘असोचेम’च्या कार्यक्रमात होते. तिथे ते काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. मोदी यांनी नागरिकत्व कायदा किंवा देशातील हिंसाचाराचा अजिबात उल्लेख न करता सद्य परिस्थितीवर अप्रत्यक्ष मत मांडले. ‘देशाला संकटातून वाचवताना लोकांच्या क्रोधाचा सामना करावाच लागतो. आरोप सहन करावे लागतात. तरीही करावे लागतेच. ७० वर्षांच्या सवयी बदलायला वेळ लागणारच, पण देशासाठी करावे लागते,’ असे ते म्हणाले.

अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल मोदी बोलत होते. मात्र, त्यांचा रोख देशातील सध्याच्या परिस्थितीवर होता, असे बोलले जात आहे. ‘असोचेम’नं आपल्या १०० वर्षांच्या वाटचालीत अनेक चढ-उतार पाहिले असतील. अनेकांनी या संस्थेचं नेतृत्व केलं असेल. ते सगळे अभिनंदनास पात्र आहेत,’ असे ही मोदी म्हणाले.

Protected Content