साहेब एकदा पुन्हा विचार करा ! : अजितदादा गटाची शरद पवारांना विनंती

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज अचानकपणे अजित पवार यांनी आपल्या सर्व मंत्री सहकार्‍यांसह शरद पवार यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा अशी गळ घातल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर आज पुन्हा ते पवारांच्या भेटीला गेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोबत्यांसह यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी एकच्या सुमारास गेले होते.

 

त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह सर्वच मोठे नेते शरद पवार यांना भेटायला गेले होते.

 

दुपारी दोनच्या सुमारास हे सर्व नेते बाहेर आले. यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी भेटीबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, शरद पवार साहेब हे मिटींगला येथे आले असतांना आम्ही वेळ न घेता येथे आलो. आम्ही त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.  याप्रसंगी राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहण्यासाठी त्यांनी योग्य विचार करावा अशी विनंती आम्ही केली असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे पटेल म्हणाले.

Protected Content