लखनऊ वृत्तसंस्था । अयोध्येतील श्रीराम मंदिरामुळे भाजपला राजकीय लाभ होण्याचे दिसून येताच आता समाजवादी पक्षाने याला तोड म्हणून युपीत परशुराम यांची १०८ फुट उंच मूर्ती उभारण्याची घोषणा केली आहे.
अलीकडेच पंतप्रधना नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य अश श्रीराम मंदिराचा शिलान्यास कार्यक्रम उत्साहात पार पडला. यामुळे भाजपला मोठ्या प्रमाणात राजकीय लाभ होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. आता याला प्रत्युत्तर देण्यासाठी समाजवादी पक्षाने धार्मिक प्रतिकाचाच आधार घेण्याची तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी असणार्या लखनऊमध्ये भगवान परशुरामाची भव्य मूर्ती उभारण्याची घोषणा पक्षातर्फे करण्यात आली आहे. या मूर्तीची उंची १०८ फूट असेल.
दरम्यान, भगवान परशुरामाची मूर्ती ही नामांकित मूर्तीकाराकडून तयार केली जाणार आहे. तर मूर्तीची स्थापना करण्यासाठी समाजवादी पक्षाच्यावतीने देणग्यांच्या माध्यमातून निधी गोळा केला जाणार आहे. उत्तरप्रदेशात ब्राह्मण समाजाचे मतदार हे अनेक मतदारसंघांमध्ये निर्णायक भूमिकेत आहेत. राज्यातील योगी सरकारवर ब्राह्मण समाज नाराज असल्याचे सांगितले जात आहे. विशेष करून विकास शुक्लाचे एनकाऊंटर आणि यानंतरच्या स्थितीत हा समाज भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे ब्राह्मण समाजाला आपलेसे करण्यासाठी भगवान परशुराम यांची मूर्ती स्थापीत केली जाणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.