कोरोनामुळे चीनचीही आर्थिक वाढ गोत्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था, । चालू वर्षात चीनच्या अर्थव्यवस्थेची वाढ ४४ वर्षांच्या नीचांकी स्तरावर पोहोचण्याची दाट शक्यता आहे. असे असले तरी, २०२१मध्ये अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग ८.४ टक्के राहण्याची शक्यता आहे. पुढील वर्षांत सुधारणा होण्याची आशा आहे.

एका अहवालानुसार, २०२०मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग २.१ टक्के राहण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षाही (२.२ टक्के) हा वेग कमी आहे. त्या वेळी जगभरातील अर्थव्यवस्थांपैकी चीनचीच अर्थव्यवस्था २०२०मध्ये आघाडीवर असेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला होता. चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत चीनची अर्थव्यवस्था रूळावर येण्याचे संकेत आहेत. तेथील प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. याच अहवालात चौथ्या तिमाहीत वार्षिक आधारावर चीनचा जीडीपी ५.८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जीडीपी ४.९ टक्क्यांनी वाढल्याचे म्हटले आहे. चीनच्या वाढीबाबत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात २०२१मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग ८.४ टक्के राहील, असे नमूद करण्यात आले आहे. या कालावधीत जगभरातील अर्थव्यवस्थांमध्येही सुधारणा होण्याची शक्यता आहे.

वाढती निर्यात आणि देशांतर्गत मागणीत झालेली वाढ या कारणांमुळे चौथ्या तिमाहीत चीनच्या अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल होतील. पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत अर्थव्यवस्थेचा वेगही वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेबरोबरच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर २०२१ ते २०२५ दरम्यान अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चीनने वरिष्ठ नेत्यांची बैठकही बोलावली आहे.

Protected Content