सियाचीनमध्ये पुन्हा हिमस्खलनाची दुर्घटना ; दोन जवान शहीद

siachen 145518599399 650x425 021116035101

 

सियाचीन (वृत्तसंस्था) लडाख या केंद्रशासित प्रदेशांतर्गत येणाऱ्या व जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सियाचीनमध्ये पुन्हा एकदा हिमस्खलनाच्या दुर्घटनेत बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकून दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण सियाचीन भागात आज (शनिवार) पहाटे लष्कराचे गस्तीपथक गस्तीवर असतानाच ही दुर्घटना घडली.

 

दक्षिण सियाचीन ग्लेशिअरमध्ये सुमारे १८,००० फूट उंचीवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर आज हिम कडा कोसळला. या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाले आहेत. याबाबत माहिती मिळताच बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व जवानांना बर्फाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश मिळवले. या सर्वांना हेलिकॉप्टरने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तिथे उपचारादरम्यान दोन जवानांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. बर्फाच्या ढिगाऱ्याखाली नेमके किती जवान अडकले होते, याचा तपशील अद्याप मिळालेला नाही. यापूर्वी १८ नोव्हेंबर रोजी देखील सियाचीन ग्लेशिअरमध्ये अशाच प्रकारे एक गस्ती पथक हिमस्खलनाच्या तावडीत सापडले होते. यामध्ये चार जवान शहीद झाले होते तर दोन पोर्टर्सचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत गस्ती पथकातील ८ जवान आणि पोर्टर बेपत्ता झाले होते.

Protected Content