धरणगावच्या श्री भवानी माता मंदिराला तीर्थक्षेत्राचा मिळवून देणार ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ऐतिहासिक यात्रा उत्सवासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे दिले आश्वासन

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुरतेची लूट केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आशीर्वाद घेतलेल्या धरणगाव येथील श्री भवानी माता मंदिराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून दिला जाईल. यानंतर परिसराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देऊ. चैत्र नवरात्र निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांनी हजेरी लावलेल्या येथील यात्रोत्सवासाठी प्रशासकीय आणि वैयक्तिक स्तरावर शक्य तेवढी सर्व मदत करण्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज भवानी मातेच्या सेवेकरांना दिले. यात्रोत्सवाची संकल्पना व माहिती देण्यासाठी मातेच्या भक्त आणि सेविकाऱ्यांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. याप्रसंगी ते बोलत होते.

श्री भवानी मातेच्या ऐतिहासिक यात्रोत्सवाचे आयोजन चैत्र महिन्याच्या १९ ते २५ दरम्यान होणार आहे. या ऐतिहासिक यात्रोत्सवाला यंदा प्रचंड भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. या दृष्टीने ज्येष्ठ सल्लागार हेमलालशेठ भाटिया यांच्या नेतृत्वाखाली मातेचे शेकडो सेवेकरी दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत. पाच दिवस चालणारा हा यात्रोत्सव म्हणजे महिला, अबाल वृध्दांसाठी भक्ती आणि मनोरंजनाची पर्वणीच ठरणार आहे. यात्रोत्सवा दरम्यानच्या अडचणी आणि खर्चाच्या नियोजनाची माहिती जिल्ह्यासह तालुक्याचे पालक असलेल्या ना गुलाबराव पाटील यांना देण्यासाठी आज श्री भवानी मातेच्या ४० सेवेकर्‍यांनी आज शहरातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पाळधी येथे गुलाबरावचे निवासस्थान गाठले. यात्रेच्या आयोजना संदर्भातील प्रशासकीय मंजुरीचा विषय ना.गुलाबराव पाटील यांनी चुटकीसरशी सोडवला. यात्रेदरम्यान सुरक्षेचे सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधितांना त्यांनी दिल्या. खर्चाच्या नियोजनाबाबत सेवेकरांनी काळजी व्यक्त करताच ‘मै हू ना’ स्टाईल मध्ये उत्तर देत, जिथे कमी पडेल तेथे मातेच्या सेवेसाठी मी तन, मन आणि धनासह उपस्थित राहील. तुम्ही फक्त यात्रोत्सवाचे नियोजन अतिशय सूक्ष्म पद्धतीने करा. मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला, वृद्ध, बालकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या, पैसा कमी पडणार नाही. तसे, तुम्ही सुद्धा तत्पर सेवा देण्यात कमी पडू नका. असा मोलाचा सल्ला गुलाबराव पाटील यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आशीर्वाद घेतलेल्या ऐतिहासिक श्री भवानी माता मंदिराच्या परिसराचा विकास करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. पुरातन अशा भवानी माता मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून देण्याचे आश्वासन ना.पाटील यांनी दिले. तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर या परिसराच्या विकासासाठी एक्शन प्लान तयार केला जाईल. तीर्थक्षेत्रासह पर्यटन स्थळ म्हणून या परिसरात विकास कामांचे नियोजन करण्यात येईल. श्री भवानी मातेच्या आशीर्वादाने या सर्व संकल्पनेला लवकरच मूर्त स्वरूप प्राप्त होईल असा विश्वास ना.गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

‘देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी’ या कविवर्य माडगूळकर यांच्या कवितांच्या ओळीची अनुभूती ना. गुलाबराव पाटील यांच्या भेटी प्रसंगी श्री भवानी मातेच्या सेवेकऱ्यांना आली. प्रशासकीय अडचणी गुलाबभाऊंनी सोडवाव्यात या अपेक्षेने आलेल्या सेवेकरांच्या झोळीत ना. गुलाबराव पाटील यांनी अनपेक्षितपणे न मागता सर्वकाही देण्याची घोषणा केल्यामुळे उपस्थित सर्वच सेवेकरी कृतकृत्य झाले. पुष्पगुच्छ देत श्री भवानी मातेच्या सेवेकऱ्यांनी ना. गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले.

Protected Content