योग क्षेत्रात करियरच्या उत्तम संधी- श्रध्दा लढ्ढा ( व्हिडीओ )

shraddha laddha

जळगाव प्रतिनिधी । योग क्षेत्रात करियरच्या उत्तम संधी असून यात अकॅडमीक्ससोबत यातील खेळाचा प्रकार हा उत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन आशियाई योग स्पोर्टस् स्पर्धेत चमकदार कामगिरी करणार्‍या श्रध्दा लढ्ढा यांनी केले. त्या ‘लाईव्ह ट्रेंडस् न्यूज’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होत्या.

जळगाव येथील सौ. श्रध्दा रूपम लढ्ढा यांनी दक्षिण कोरीयात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या एशियन योगा स्पोर्टस् स्पर्धेत दोन सुवर्ण तर तीन रौप्य पदके पटकावण्याची कामगिरी केली आहे. त्या प्रतिथयश उद्योजक रवी लढ्ढा यांच्या स्नुषा अर्थात, त्यांचे पुत्र रूपम लढ्ढा यांच्या सौभाग्यवती आहेत. त्यांनी मिळवलेले यश ही जळगावकरांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. आशियाई स्पर्धेतील त्यांच्या यशाचे औचित्य साधून श्रध्दा लढ्ढा यांच्याशी ‘लाईव्ह ट्रेंडस् न्यूज’चे संपादक शेखर पाटील यांनी वार्तालाप करून त्यांच्या आजवरच्या वाटचालीसह या क्षेत्रातील प्रवास जाणून घेतला.

बालपणीच आवड

सौ. श्रध्दा मुंदडा-लढ्ढा या मूळच्या यवतमाळ येथील रहिवासी. त्या लहान असतांना त्यांचे आजोबा हे टिव्हीवर बाबा रामदेव यांचा कार्यक्रम पाहून योगाभ्यास करायचे. याच वेळेस चिमुकल्या श्रध्दाला योगाविषयी कुतुहल निर्माण झाले. आजोबांप्रमाणे ती शरीराला वेगवेगळ्या प्रकारे वाकवून दाखवू लागली. यामुळे तिला ‘रबर डॉल’ हे नाव मिळाले. जे त्यांनी नंतर उपाधी बनले. दरम्यान, आजोबांनी तिला योगासने शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. यातून त्यांना खर्‍या अर्थाने या विषयाची गोडी लागली. यासोबत आई, वडिल आणि भावासह संपूर्ण कुटुंबाने त्यांच्या छंदाला पाठबळ दिले. यातून योग हेच आपल्या आयुष्याचे ध्येय असल्याचे श्रध्दाजींच्या लक्षात आले.

अपयशातून सुरवात

दरम्यान, एकीकडे योगाभ्यास करत असतांना, याच्यासोबत शालेय जीवनात योग स्पोर्टस्शी संबंधीत विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यास त्यांनी प्रारंभ केला. तथापि, यातील त्यांचे काही प्रयत्न फसले. अर्थात, यात त्यांना अपयश आले. मात्र त्या नाऊमेद झाल्या नाहीत. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे प्रयत्न त्यांनी सुरूच ठेवले. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची जर्सी पाहून त्यांना आपणदेखील कधी तरी राज्यातर्फे खेळू अशी आस लागली. त्यांनी हा संकल्पच घेतला. आणि या मेहनतीला लवकरच फळदेखील मिळाले. त्यांनी विविध राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादन केले. यानंतर २०१४ साली त्यांनी आशियाई स्पर्धेत यश मिळवले. तर अलीकडेच दक्षिण कोरियातील येऊसू शहरात झालेल्या नवव्या आशियाई योगा स्पोर्टस् काँपीटिशन स्पर्धेत त्यांनी दोन सुवर्ण तर तीन रौप्य पदके पटकावली. विशेष बाब म्हणजे या स्पर्धेतील कंपलसरी योगा, रिदमीक योगा, आर्टीस्टीक (सिंगल व पेअर) व फ्रि फ्लोअर योगा या पाच वर्गवारीत त्यांनी भाग घेऊन प्रत्येकात यश संपादन केले. यात वैयक्तीक, जोडी आणि संघ या तिन्ही पातळीवरील पदकांचा समावेश असल्याची बाब लक्षणीय आहे.

योगाला पर्याय नाहीच !

आपल्या आजवरच्या वाटचालीसाठी सौ. श्रध्दा लढ्ढा यांनी आपले माहेर आणि सासरच्या मंडळीने दिलेल्या प्रोत्साहनाचा आवर्जुन उल्लेख केला. विशेष म्हणजे सासरी त्यांना यासाठी चांगले प्रोत्साहन दिले जात आहे. पती, सासू-सासरे, नणंद या स्वत: योगाभ्यास करत असल्यामुळे घरातूनच पाठबळ मिळाल्याचे त्या म्हणाल्या. सौ. श्रध्दा लढ्ढा या सध्या योगा थेरपीमध्ये एम.एस्सी. करत आहेत. तर आशियाई स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर त्यांचे लक्ष आता वर्ल्ड योगा चँपियन बनण्याचे आहे. या स्पर्धेसाठी त्यांची निवडदेखील झाली आहे. याच्या जोडीला जळगाव शहरात योगाभ्यासाशी संबंधीत एक अकॅडमी सुरू करण्याचा संकल्पदेखील त्यांनी घेतला आहे. एक योगायोग असा की त्यांचीच शिष्टा श्रावणी पाचखेडे हिनेदेखील आशियाई स्पर्धेत एक रौप्य व एक कांस्य पदक पटकावले आहे. दरम्यान, निरोगी जीवनासाठी योगाला पर्याय नसल्याचे ठाम मत व्यक्त करतांनाच तरूणाईने या क्षेत्रातील करियरच्या विविध संधींचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

पहा : श्रध्दा लढ्ढा यांच्यासोबतच्या वार्तालापाचा व्हिडीओ.

आशियाई स्पर्धेतील पदकांसह श्रध्दा लढ्ढा

पहा : श्रध्दा लढ्ढा यांच्या कौशल्याची झलक दाखविणारा नुकत्याच झालेल्या स्पर्धेतील हा व्हिडीओ.

Protected Content