यावल, प्रतिनिधी | शहरातील नगर परिषदेच्या विस्तारीत वस्तीमध्ये काही दिवसांपुर्वी उभारण्यात आलेल्या सार्वजनिक उद्यानाचे काम ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट प्रतीचे केल्याचे निदर्शनास आले असून परिसरातील नागरिकांमधून प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार शहरातील गंगानगर या भागात महादेव मंदीर असुन या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. या ठिकाणी दर्शनाकरीता महिला व पुरुषांसह लहान चिमुकली मुलेही मोठया संख्येने येत असतात. या दृष्टीकोनातुन भाविकांच्या भावनेचा आदर करून गंगानगर परिसरातील तरुण युवकांनी या महादेव मंदिराच्या आवारात सुंदर असे उद्यान व्हावे, अशी अपेक्षा ठेवुन आपल्या क्षेत्रातील लोकप्रातिनिधीच्या माध्यमातुन नगरपरिषदकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी योग्य तो निधी मिळवला, मात्र प्रत्यक्षात संबंधीत ठेकेदाराकडुन ज्या पद्धतीने या उद्यानाचे काम ठेकेदाराकडुन निकृष्ट प्रतीचे करण्यात आले, ते पाहुन गंगानगर परिसरातील नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
नगर परिषदच्या माध्यमातुन लाखो रुपये खर्च करून करण्यात आलेल्या या उद्यानाचे काम सुरू असतांना नगर परिषद प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्याने या कामाकडे फिरकुन पाहिले नाही, परिणामी ठेकेदाराने प्रशासनाने घातलेल्या निवेदेतील अटीशर्ती आणि निकष धाब्यावर ठेवुन घाईघाईने कामाला आटोपते घेवुन काढता पाय घेतला. काही दिवसा पुर्वीच काम करण्यात आलेल्या उद्यानातील बांधकाम आताच तुटु लागल्याने सदरचे हे काम निकृष्ट प्रतिचे झाले असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनात आले आहे. त्यामुळे याबाबतची तक्रार नगर परिषदेकडे करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.