आपत्कालीन स्थितीसाठी पाचोरा प्रशासन सज्ज

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यंदाचा पावसाळा सुरु होण्याआधी पाचोरा प्रशासन सज्ज झाली असून शहरातील नाल्यांमधील गाळ काढणे, रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये मुरुम टाकणे आधी कामे केली जात आहे.

यंदाचा पावसाळा सुरु होण्याअगोदर नगरपरिषदेने नदी काठी व नाल्याकाठी राहणाऱ्या नागरीकांना घरे, झोपडया यांना जिवीत व वित्त हानी होऊ नये यासाठी नोटीसा बजाविण्यात येत आहेत. पाचोरा शहरातून जाणाऱ्या नाल्यांची जे.सी.बी.द्वारे गाळ काढणे, नाले साफ करणे इत्यादी कामे हाती घेतली जात आहे. तसेच शहरातील कॉलन्यांमधील किरकोळ स्वरुपातील रस्त्यांवरील खड्‌डे मुरुम पसरवून बुजविण्याची कामे लवकरच हाती घेण्यात येत आहे.

शहरातील विविध कॉलन्यांमधून सांडपाणी निचरा समस्येकरीता जे. सी. बी. द्वारे कच्च्या नाल्या कोरण्यासाठी कार्यवाही गरजेनूसार करण्यात येत आहे. उर्वरीत ठिकाणी स्वच्छता सफाई अभियानातून राबविण्यात येणार आहे. तसेच शहरातील मोडकळीस आलेल्या आणि पावसामुळे पडण्याची शक्यता असलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करुन इमारत मालकांना नोटीस बजाविण्यात येत आहेत. तसेच संभाव्य अतिवृष्ठीच्या काळात नदी किनार नाला किनार आणि सखल भागातील पाचोरा शहरातील नागरीकांना जागृत राहण्यासाठी वृत्तपत्राद्वारे आवाहन जाहिरात प्रसिध्द करण्यांत येत आहे.

संभाव्य पावसाळयातील उदभवणाऱ्या समस्यांकरीता नागरिकांकरीता नगरपरिषदेत आपातकालीन कक्ष उघडण्यात आला असून अचानक कोसळणाऱ्या जुन्या इमारती, नदी किनारावरील लोकवस्ती यांना टाऊन हॉल, नगरपालिका हॉल, श्रीराम मंदिर आदि ठिकाणी आपत्ती काळात पर्यायी निवारा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आलेले असल्याचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी सांगीतले. नगरपरिषदेतर्फे पावसाळयापुर्वी सुयोग्य नियेाजन केल्याने नागरीकांकडून प्रतिक्रिया येत असून नागरीकांनी नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानले आहे.

 

Protected Content