


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके उपलब्ध न झाल्याचा गंभीर मुद्दा आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत पाठ्यपुस्तकांचा अपुरा पुरवठा झाल्याने हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण पुस्तकांविनाच सुरू असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
आमदार खडसे यांनी सांगितले की, राज्यातील अनेक शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून पाठ्यपुस्तकांचा तुटवडा जाणवत आहे. शासनाकडून पुस्तकांचे वितरण सुरू असले तरी प्रत्यक्षात अनेक शाळांना आवश्यक संख्येने पुस्तके मिळालेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून अध्यापनावर त्याचा थेट परिणाम होत आहे. यावेळी त्यांनी सेतू अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचाही प्रश्न उपस्थित केला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पातळीतील दरी भरून काढण्यासाठी सेतू अभ्यासक्रम महत्त्वाचा मानला जातो. मात्र, ही पुस्तकेही अद्याप अनेक शाळांपर्यंत पोहोचलेली नसल्याने शिक्षकांना नियोजनबद्ध पद्धतीने अध्यापन करता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तक वितरणाबाबत आवश्यक सूचना दिल्या असल्या तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचेही आ. खडसे यांनी नमूद केले. वितरण प्रक्रियेत झालेला विलंब आणि नियोजनातील त्रुटी यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. जळगाव जिल्ह्यासह राज्यातील सर्व शाळांमध्ये पाठ्यपुस्तके आणि सेतू अभ्यासक्रमाची पुस्तके तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी विधानपरिषदेत केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पुस्तक वितरण प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.



