Home आरोग्य ‘मिशन राइज एक्स’साठी युवकांनी पुढे या! नशामुक्तीच्या लढ्यात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंचे...

‘मिशन राइज एक्स’साठी युवकांनी पुढे या! नशामुक्तीच्या लढ्यात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंचे आवाहन

0
16

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात युवकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले. गतवर्षी जिल्ह्यात पोलिसांनी ६ कोटी रुपयांचे, तर यंदा आतापर्यंत ४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. विशेषतः १७ ते ३० वयोगटातील तरुण व्यसनांकडे मोठ्या प्रमाणात वळत असल्याने ‘मिशन राइज एक्स’ची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा पोलीस दल आणि युवाशक्ती फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (१६ ऑगस्ट) वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन राइज एक्स’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

नशेचे दुष्परिणाम आणि कायद्याची माहिती

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हुमेद महाडिक यांनी व्यसनांची कारणे, शरीरावर होणारे गंभीर परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत चलचित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले. ‘व्यसनांना नाही म्हणण्याची हिंमत ठेवा’, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये कायद्यानुसार होणाऱ्या शिक्षांची माहिती दिली. यावेळी उपस्थितांना नशामुक्तीची शपथही देण्यात आली.

वैद्यकीय विद्यार्थी बनणार ‘रोल मॉडेल’

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी वैद्यकीय विद्यार्थी समाजासाठी रोल मॉडेल असल्याचे सांगत नशामुक्ती अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात ज्युनिअर मकरंद अनासपुरे यांनी मिमिक्रीच्या माध्यमातून नशामुक्तीचा संदेश दिला.

कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, डीवायएसपी केदार बारबले, डॉ. वैभव पाटील, विराज कावडीया यांच्यासह पोलीस अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Protected Content

Play sound