शूटिंग वर्ल्ड कप : मनू भाकरने पटकावले सुवर्णपदक

manu bhakar

नवी दिल्ली, प्रतिनिधी | भारताची आघाडीची नेमबाजपटू मनू भाकर हिने शूटिंग वर्ल्ड कप फायनल्समधील (ISSF) महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल गटात सुवर्णपदक पटकावले आहे. मनूने २४४.७ गुण मिळवून ज्युनिअर विश्व विक्रमाची नोंद करीत हे सुवर्ण पदक पटकावले आहे. बुधवारी तिला महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तूल गटात फायनलसाठी पात्रता मिळवता आली नव्हती.

 

अवघ्या १७ वर्षीय मनू भाकर हिने ज्युनिअर विश्व विक्रमाची नोंद करीत सुवर्णपदक पटकावले आहे. यासोबतच ती आयएसएसएफ विश्व कपमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी हिना सिद्धूच्या नंतर पदक जिंकणारी दुसरी भारतीय नेमबाज बनली आहे. या स्पर्धेच्या फायनल राउंडमध्ये भारताची यशस्विनी सिंह देसवाल (१५८.८) आठव्या स्थानावर राहिली. सर्बियाची जोराना अरुनोविक (२४१.९) ने रौप्य पदक पटकावले आहे. तर चीनच्या क्वियान वांग (२२१.८) हिने कांस्य पदक पटकावले आहे. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल गटात अभिषेक वर्मा आणि सौरभ चौधरीने फायनलमध्ये धडक मारली आहे. क्वालिफिकेशनमध्ये अभिषेक वर्मा ५८८ गुणांसोबत टॉपवर राहिला. तर सौरभ चौधरी ५८१ गुणांसह सातव्या स्थानावर राहिला.

याआधी बुधवारी मनु शूटिंग वर्ल्ड कपच्या फायनल्समध्ये महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तुल गटात फायनलसाठी पात्र ठरली नव्हती. कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या मनूने प्रिसिशनमध्ये २९२ आणि रॅपिडमध्ये २९१ गुण मिळवले होते. तिचा क्वालिफायरमध्ये एकूण स्कोर ५८३ राहिला. मनू आणि यशस्विनी या दोघींनी पुढील वर्षी टोकिओ ऑलिम्पिकसाठी १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत कोटा मिळवला आहे. म्यूनिखमध्ये आयएसएसएफ विश्व कपमध्ये चौथ्या स्थानावर राहिल्यानंतर मनूने कोटा जिंकला होता. रियो डि जेनेरियोमध्ये आयएसएसएफ विश्व कप मध्ये सुवर्ण पदक मिळवल्यानंतर यशस्विनीने हे स्थान मिळवले आहे.

Protected Content