जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आपल्या १६ वर्षीय मुलाचा शोध घेण्यासाठी मुंबईत गेलेल्या एका आईला मोठा धक्का बसला. गेल्या २१ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तिच्या मुलाचा मृतदेह जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती इमारतीच्या छतावर वायरींमध्ये गुंडाळलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत बुधवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास आढळून आला. अरबाज शेख (वय १६, रा. मास्टर कॉलनी) असे मृत मुलाचे नाव असून, कबुतर पकडण्यासाठी तो घराबाहेर पडला असताना त्याला विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अरबाज शेख हा मास्टर कॉलनीत आजी-आजोबा आणि आईसह राहत होता. ८ मे रोजी तो कबुतर पकडण्यासाठी घरातून बाहेर पडला, परंतु रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्या आईने आसपासच्या परिसरात शोध घेतला, पण अरबाज मिळून आला नाही. अखेर, आईने एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन मुलाला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली होती, त्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत, उग्र वास आल्यावर घटना उघड:
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका इमारतीच्या छतावर बुधवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एक व्यक्ती पाण्याची टाकी तपासण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला उग्र स्वरूपाचा वास आला. जवळ जाऊन पाहिले असता, त्याला केबलसारख्या वायरींमध्ये एक मृतदेह गुंडाळलेल्या अवस्थेत दिसला. त्याने तातडीने जवळील पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अरबाजच्या आजोबांनी मृतदेह पाहिल्यानंतर, शर्टावरून त्यांनी नातू अरबाजला ओळखले. त्यानंतर त्याची संपूर्ण ओळख पटली. अरबाजचा मृतदेह तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. यावेळी रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रमंडळींची प्रचंड गर्दी झाली होती. या घटनेमुळे जळगावात खळबळ उडाली आहे.