विजेचा धक्का लागून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू; चटई कंपनीतील घटना


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील एका चटई कंपनीत फॅन लावत असताना अचानक विजेचा जोरदार धक्का लागून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार, २८ मे सकाळी घडली. अनिल बारेला (मूळ रा. मध्यप्रदेश) असे मृत कामगाराचे नाव असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल बारेला हा मूळचा मध्यप्रदेश येथील रहिवासी असून, तो जळगाव एमआयडीसीतील एका चटई कंपनीत काम करत होता. याच परिसरात तो आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. आज सकाळी कंपनीत फॅन बसवण्याचे काम करत असताना, त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का लागला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच, त्यांनी तातडीने अनिल बारेला याला जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कंपनीतील कामगार आणि परिसरात शोककळा पसरली असून, कामाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एमआयडीसी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.