सहकार्‍यांच्या अमानवी वागणुकीमुळे तरूणाची आत्महत्या; गुन्हा दाखल

aniket dilip patil जळगाव प्रतिनिधी । डॉ. पायल तडवी यांच्या रॅगींगमुळे आत्महत्या केल्याचे प्रकरण शांत होत नाही तोच जिल्ह्यातील अजून एका तरूणाने सहकार्‍यांच्या अमानवी वागणुकीमुळे मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याबाबत वृत्त असे की, वरणगाव आयुध निर्माणीत कार्यरत असणारे दिलीप पाटील यांचा चिरंजीव अनिकेत (वय २५) दिलीप पाटील याने २७ जून रोजी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली होती. अतिशय हुशार, शांत, सुस्वभावी आणि धार्मिक वृत्तीच्या अनिकेतने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याबद्दल त्याच्या कुटुंबियांसह आप्तांनाही प्रश्‍न पडला होता. दरम्यान, त्याचे त्याच्या तेराव्यानंतर घरच्यांनी अनिकेतची सुटकेस उघडली. यात त्यांना एक पाकीट (एनव्हलप) दिसले. यामध्ये त्याने तीन पानी सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे त्यांना आढळले. ही नोट वाचून कुटुंबियांना धक्का बसला.

या सुसाईड नोटमध्ये अनिकेतने आपण आत्महत्येसारखे पाऊल का उचलत आहोत याबाबत सविस्तरपणे लिहले आहे. यानुसार अनिकेतने एमबीए केल्यानंतर एका मोठ्या कंपनीत काम सुरू केले होते. येथील काही सहकारी त्याला सातत्याने टोमणे मारत होते. हे सहकारी त्याचे रूममेटदेखील होते. यात तो शाकाहारी, निर्व्यसनी आणि धर्मपरायण असल्याची खिल्ली उडविली जात होती. तो मुलींच्या मागे लागत नसल्यामुळे तो समलैंगीक असल्याचे म्हटले जात होते. यामुळे त्रासलेल्या अनिकेतने कंपनीच्या एचआर मॅनेजरकडे लेखी तक्रार केली होती. मात्र याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्याने याबाबत घरच्यांना माहिती देऊन नोकरी सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. घरच्यांनी याला संमतीदेखील दिली होती. मात्र यानंतर एका मित्राच्या पार्टीनंतर त्याचा मृतदेह आढळल्याने पाटील कुटुंबिय हादरले. यानंतरचा घटनाक्रम सुसाईड नोटमधून समोर आला.

अनिकेतने आपल्या या सुसाईड नोटमध्ये आकाश वडेरा, दर्पण घोडके, झाकीर हुसेन, विकास अगरवाल, राजीव सोहनी आणि सचिन श्रीवास्तव हे सहकारी आपल्याला त्रास द्यायचे असे नमूद करत पोलिसांनी आपल्याला न्याय देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पवई पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केली आहे.

अलीकडेच डॉ. पायल तडवी या उच्चशिक्षित तरूणीने सहकार्‍यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले होते. यानंतर आता अनिकेत पाटीलनेही याच प्रकारातून आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Protected Content