धक्कादायक : रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमी युगलाने जीवन संपवले !


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे एका विवाहित प्रेमी युगलाने रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे प्रेमी युगल, योगेश रामदास ठाकरे (वय ३५) आणि मीना बबलू ठाकरे (वय २८), दोघेही विवाहित असल्याने त्यांच्या कुटुंबीयांकडून या प्रेमसंबंधांना तीव्र विरोध होता. याच कारणामुळे त्यांनी एकत्र आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे बोलले जात आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार भगवान चौधरी पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, परधाडे येथील योगेश रामदास ठाकरे आणि मीना बबलू ठाकरे यांचे गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध जुळले होते. योगेशला पत्नीपासून तीन मुले आहेत, तर मीनालाही पती बबलू ठाकरे यांच्यापासून तीन मुले आहेत. दोघेही घरांच्या काही अंतरावर राहत असल्याने त्यांचे प्रेमसंबंध जुळले. मात्र, योगेशच्या पत्नीला आणि मीनाच्या पतीला या अनैतिक संबंधांची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही कुटुंबांकडून याला मोठा विरोध होऊ लागला. यामुळे योगेश ठाकरे गेल्या तीन महिन्यांपासून चाळीसगाव तालुक्यातील त्याच्या बहिणीच्या गावी राहत होता.

तीन महिन्यांनंतर तो तीन दिवसांपूर्वीच परधाडे येथे परतला होता. त्यानंतर मंगळवारी (२ जुलै २०२५ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दोघांनी एकत्र घरातून पलायन केले. त्यांचा अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला, परंतु बुधवार (३ जुलै २०२५ रोजी) सकाळी दहा वाजेच्या सुमारास डाऊन साईटवरील रेल्वे किलोमीटर खांबा नंबर ३८४/२५ दरम्यान त्यांचे मृतदेह आढळून आले. परधाडे येथील गँगमनला ही घटना दिसल्यानंतर त्यांनी पाचोरा स्टेशन मास्तरला आणि रेल्वे स्टेशनच्या ३४ भ्रमणध्वनीद्वारे ही माहिती कळवली.

ही घटना पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परधाडे ते वडगाव दरम्यान घडल्याने तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल हरीश परदेशी, रुग्णवाहिका चालक किशोर लोहार आणि मंगेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मृत मीना ठाकरेच्या पतीने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
योगेश रामदास ठाकरे आणि मीना बबलू ठाकरे यांचे गेल्या वर्षापासून अनैतिक संबंध असल्याने मंगळवारी त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती मीना ठाकरेचा पती बबलू ठाकरे यास सकाळी कळताच, बबलू ठाकरे सकाळपासूनच दारूच्या नशेत होता आणि त्याने पत्नी मीना ठाकरेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

योगेश ठाकरे तीन दिवसांपूर्वीच घरी परतला होता
योगेश ठाकरे आणि मीना बबलू ठाकरे यांचे एक वर्षापासून अनैतिक संबंध असल्यामुळे आणि त्यांचे ‘पितळ उघडे’ पडल्याने दोघांच्या कुटुंबाकडून या प्रकरणाला तीव्र विरोध होता. घरात भांडणे होत असल्याने योगेश ठाकरे गेल्या तीन महिन्यांपासून त्याच्या बहिणीकडे बाहेरगावी राहण्यासाठी गेला होता. मात्र, गेल्या तीन दिवसांपूर्वीच योगेश ठाकरे घरी आल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत योगेश ठाकरे आणि मीना ठाकरे यांनी दोघे मिळून एकाच वेळी आपले जीवन संपविले. या घटनेमुळे परधाडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.