जिल्ह्यात ‘आयुष्यमान भारत’ योजना थेट घराघरात; ९० दवाखान्यांची यादी ग्रामपंचायतींवर


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल (IAS) यांच्या अभिनव संकल्पनेतून जिल्ह्यात “आयुष्यमान भारत योजना लाभप्राप्त दवाखान्यांची यादी” प्रत्येक ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर लावण्याची एक व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे.

या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ११५९ ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डवर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभ उपलब्ध असलेल्या ९० दवाखान्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. गावपातळीवर ही माहिती सहज उपलब्ध झाल्याने गरजू नागरिकांना योग्य दवाखाना शोधण्यासाठी होणारी धावपळ थांबणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल या स्वतः या मोहिमेचा नियमित आढावा घेत आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीकडून यादी नोटीस बोर्डवर चिकटविल्याचे छायाचित्र मागवून त्या खात्री करत आहेत. हा उपक्रम म्हणजे शासनाच्या आरोग्य सेवांचा खरा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे एक उत्कृष्ट उदाहरण मानले जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या परिसरातील आयुष्यमान भारत लाभप्राप्त दवाखान्यांची माहिती मिळणार असून, विविध आजारांवर मोफत व सुलभ उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत रुग्णालयीन उपचार एका कुटुंबासाठी उपलब्ध आहेत. सरकारी तसेच मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा मिळते. १३५० पेक्षा जास्त रोगांवर मोफत उपचार उपलब्ध आहेत, ज्यात हृदयरोग, कॅन्सर, मूत्रपिंड विकार, अपघाती उपचार इत्यादींचा समावेश आहे. प्रक्रिया पूर्णपणे कॅशलेस (Cashless) आणि पेपरलेस (Paperless) आहे. उपचारासाठी रुग्णालयात भरती होण्यापूर्वी आणि नंतरची देखील सेवा (pre and post hospitalization) समाविष्ट आहे.

ई-कार्डद्वारे ओळख – लाभार्थीला आधार कार्ड/राशन कार्डद्वारे ओळखले जाते.
कोणत्या प्रकारचे उपचार मिळतात? या योजनेत सर्जरी (हृदय, मेंदू, डोळे, मूत्रपिंड, हाडे इ.), प्रसूती सेवा, कॅन्सर, किडनी डायलेसिस, अपघातानंतरचे उपचार, बालरोग व स्त्रीरोग, तसेच मेंदू विकार, दमा, मधुमेह इत्यादींवर उपचार उपलब्ध आहेत.