धक्कादायक : ‘सेफ्टी डोअर’ उघडताच केमिकल स्प्रे मारून तरुणीवर बलात्कार !


पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. काल (बुधवारी, २ जुलै रोजी) रात्री साडेसातच्या सुमारास एका २५ वर्षीय तरुणीवर कुरिअर बॉय असल्याचे सांगून एका अज्ञात व्यक्तीने अत्याचार केला आहे. या घटनेमुळे उच्चभ्रू आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोसायट्यांमधील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या घटनेबाबत पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी माहिती दिली. त्यानुसार, आरोपीने अत्यंत हुशारीने सोसायटीमध्ये प्रवेश केला. त्याने स्वतःला कुरिअर बॉय म्हणून ओळख दिली आणि पीडित तरुणीच्या दरवाजावर पोहोचल्यावर तिला ‘बँकेचे कुरिअर’ असल्याचे सांगितले. तरुणीने ते आपले नसल्याचे सांगितल्यावर, आरोपीने त्यावर सही करणे आवश्यक असल्याचे भासवले. यामुळे तरुणीने ‘सेफ्टी डोअर’ (सुरक्षा दरवाजा) उघडला आणि याच संधीचा फायदा घेत नराधम आरोपी जबरदस्तीने घरात शिरला.

घरात शिरताच आरोपीने तरुणीच्या तोंडावर केमिकल स्प्रे मारला, ज्यामुळे ती तात्काळ बेशुद्ध झाली. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. ही तरुणी मूळची अकोल्याची असून, ती कोंढव्यात आपल्या भावासोबत राहते आणि पुण्यातील कल्याणी नगरमधील एका कंपनीत नोकरी करते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

उच्चभ्रू आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोसायटीत ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपीने कुरिअर बॉयचा वेश घेतल्याने सुरक्षा रक्षकांनी त्याची फारशी चौकशी केली नाही. कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. आरोपीची ओळख पटवण्यासाठी सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सोसायट्यांच्या सुरक्षा नियमांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशा घटना टाळण्यासाठी सोसायट्यांनी पाहुण्यांच्या आणि सेवा देणाऱ्या व्यक्तींच्या नोंदी अधिक कठोरपणे ठेवण्याची गरज आहे.