सांगली जिल्हयात शरद पवारांना धक्का; मोठा नेता भाजपच्या वाटेवर

सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एका बाजूला समरजीत घाटगे, हर्षवर्धन पाटील, विवेक कोल्हे हे नेते भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचंद्र पक्षाचे नेते, माजी मंत्री आणि शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक हे भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी नुकतीच नाईक यांची भेट घेतली. दोघांची बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे शिराळ्यात भाजपा शरद पवार यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. सांगलीत नुकताच भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळावा संपल्यानंतर तावडे यांनी शिवाजीराव नाईक यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.

सध्या शिराळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मानसिंगराव नाईक आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. तर महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपाला सुटणार असल्याचे दिसून येते. भाजपाकडून सध्या सम्राट महाडिक यांचे नाव चर्चेत आहे. ते गत पाच वर्षापासून आमदारकीसाठी तयारी करत आहेत. तसेच माजी आमदार शिवाजीराव नाईक यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख हे देखिल भाजपाकडून उमेदवारी मागत आहेत. अशात आता शिवाजीराव नाईकही भाजपामध्ये आले तर उमेदवारी कोणाला मिळणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Protected Content