पश्‍चीम बंगालमध्ये इस्त्राएल-गाझा यांच्यासारखाच संघर्ष ! : शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । प. बंगालमधील राजकीय संघर्ष हा इस्रायल-गाझा संघर्षाइतकाच तीव्र आहे. केंद्र विरुद्ध राज्य संघर्षाचे हे शेवटचे टोक असल्याचे नमूद करत शिवसेनेने आज याबाबत भाष्य करत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

पश्‍चीम बंगालमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षावर आज शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनातील अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, इस्रायल आणि गाझा संघर्षाइतकाच तीव्र संघर्ष सध्या ममता बॅनर्जी व केंद्र सरकारमध्ये सुरू आहे. केंद्रात मोदी-शहा आहेत तोपर्यंत तरी या संघर्षाला अंत नाही. प. बंगालच्या निवडणुका संपल्यावर तेथे शांतता नांदेल, सर्व सुरळीत होईल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. निवडणुकीत दारुण पराभव झाला, पण भारतीय जनता पक्ष पराभव स्वीकारायला तयार नाही व केंद्रीय तपास पथकांच्या माध्यमांतून ममता बॅनर्जींवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. नारदा स्टिंग प्रकरणात सीबीआयने पश्चिम बंगालचे फिरहाद हकीम आणि सुब्रत मुखर्जी हे विद्यमान मंत्री, सोवन चॅटर्जी हे माजी मंत्री आणि आमदार मदन मित्रा अशा चौघांना अटक केली. हे चौघेही सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेते आहेत. नारदा स्टिंग प्रकरणात राजकीय नेते पैसे स्वीकारत असल्याचा भ्रष्टाचार कॅमेऱयात टिपला गेला. हे गंभीर आहे, पण आश्चर्य असे की, या भ्रष्टाचारातील आणखी दोन आरोपी सुखेन्दू अधिकारी व मुकुल रॉय हे सध्या भाजपमध्ये आहेत. ‘मी सुखेन्दू अधिकारी यांनाही पैसे दिले व तसे कॅमेऱयात आहे. मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही?’

लोकशाहीत जय-पराजय खुल्या दिल्याने स्वीकारावे लागतात, पण बंगालातील ममतांचा विजय केंद्राला मान्य नाही व त्यांच्या सरकारला काम करू दिले जाणार नाही, असे धोरण ठरलेले दिसते. ममता बॅनर्जी यांच्या मंत्र्यांना व आमदारांना अटक केल्यावर राज्यातील वातावरण बिघडेल व आक्रमक स्वभावानुसार ममता दीदी रस्त्यावर उतरतील हे भाजपच्या केंद्रीय तपास पथकाला वाटले असावे व नेमके तसेच घडले. हजारो समर्थकांसह ममता बॅनर्जी रस्त्यावर उतरल्या व सीबीआय कार्यालयावर चाल करून गेल्या. मुख्यमंत्री बॅनर्जी तब्बल सहा तास सीबीआय कार्यालयात ठाण मांडून बसल्या.

यात पुढे नमूद केले आहे की, बॅनर्जी यांचे नेतृत्व संघर्षातून तावूनसुलाखून बाहेर पडलेले आहे. हा संघर्षही देशाला नवी दिशा देईल. प. बंगालमधील राजकीय संघर्ष हा इस्रायल-गाझा संघर्षाइतकाच तीव्र आहे. केंद्र विरुद्ध राज्य संघर्षाचे हे शेवटचे टोक आहे. प. बंगालमधील ममता बॅनर्जी यांचा विजय मोदी-शहा यांनी इतका मनाला लावून घेण्याचे कारण नव्हते. पण सध्याच्या नव्या घडीत प्रत्येक जय-पराजय हा व्यक्तिगतरीत्या घेतला जातो. त्यामुळे जिंकलेल्या ममतांना नामोहरम करून नमवायचेच असे केंद्राने ठरवले असेल तर ते लोकशाही परंपरांना हरताळ फासत आहेत. पण बोलायचे कोणी? हे असेच चालू राहणार आहे.

Protected Content