….तर औषधी विक्रेते दुकाने बंद करणार ! : जगन्नाथ शिंदे यांचा इशारा

मुंबई प्रतिनिधी । कोविडच्या प्रतिकारात निर्णायक भूमिका बजावल्यानंतरही औषधी विक्रेत्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. यामुळे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही दुकाने बंद करून लॉकडाऊनमध्ये सहभागी होऊ असा इशारा औषधी विक्रेत्यांच्या संघटनेचे राज्य व राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिला आहे.

अखील भारतीय तसेच महाराष्ट्र मेडीसीन डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी एक पत्रक जारी करून विविध मागण्या केल्या आहेत. यात म्हटले आहे की, महाराष्ट्रासह देशात २०० पेक्षा अधिक औषध विक्रेते कोविड-१९ चे बळी पडले आहेत. १००० च्या जवळपास परिवारातील त्यांचे नातेवाईक बाधित झालेले आहेत. असे असूनही केंद्र किंवा राज्य सरकारने कोविड योद्धा म्हणून सन्मान तर दिला नाहीच, परंतु साधे लसीकरणात प्राधान्य देण्याचे औदार्य दाखवले नाही, याची खंत सर्व औषध विक्रेत्यांच्या मनात आहे.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, कोरोना महामारीत अग्रक्रमाने काम करणार्‍यांच्या यादीत कोविड योद्धा म्हणून औषध विक्रेत्यांच्या सेवेकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. औषध विक्रेते जीवावर उदार होऊ न २४ तास सेवा देत आहेत. त्यामुळे देशासह महाराष्ट्रात औषध पुरवठा सुरळीत राहण्यात मदत झाली आहे. यामुळे संघटनेने वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल न घेतल्यास लॉकडाऊनमध्ये सहभागी होऊन व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा जगन्नाथ शिंदे यांनी या पत्रकाद्वारे दिलेला आहे.

Protected Content