धरणगाव तालुक्यातील तिघांची आत्महत्या; कारण गुलदस्त्यात

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भोद येथील रहिवासी असणार्‍या राजेंद्र रायभान देसले यांनी आपली पत्नी व मुलीसह तापी नदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत वृत्त असे की, भोद येथील राजेंद्र रायभान देसले (पाटील) यांनी आपली पत्नी व मुलीसह तापीच्या पात्रात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याचे काल सायंकाळी उघडकीस आले आहे. यात ते आणि त्यांच्या मुलीचा मृतदेह आढळून आला असून पत्नीचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही.

शिंदखेडा तालुक्यातील दभाशी येथील तापी नदीच्या पुलावर काल दुपारी राजेंद्र देसले (वय ५४) यांची एमएच-१९ पीए १०९४ या क्रमांकाची चारचाकी लागलेली दिसून आली. खरं तर, ते नातेवाईकाकडे कार्यक्रमाला गेले होते. मात्र ते घरी न परतल्यामुळे त्यांच्या मुलाने फोन केल्यावर ते तेथून निघून गेल्याचे समजले. यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला. तापी नदीच्या पुलावर त्यांची गाडी दिसल्याने त्यांचा पात्रातील पाण्यात शोध सुरू करण्यात आला. यात रात्री उशीरापर्यंत ते आणि त्यांची मुलगी ज्ञानल यांचे मृतदेह आढळून आले आहे. तर पत्नी वंदनाबाई (वय ४८) यांच्या मृतदेहाचा अद्याप शोध सुरू आहे.

राजेंद्र देसले हे राजकारण, सहकार आणि समाजकारणात सक्रीय होते. ते भाजपचे तालुका उपाध्यक्ष होते. त्यांनी अकस्मात आत्मघाताचे पाऊल उचलल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांनी इतक्या टोकाचा विचार का केला ? याबाबतही कुणाला काही कळेनासे झाले आहे.

Protected Content