मुंबई प्रतिनिधी | लागोपाठ २० वर्षे सत्तेत असून देखील गुजरातमध्ये भाजपला नेतृत्व बदलावेसे वाटते, यामुळे हेच विकास मॉडेल आहे का ? असा प्रश्न विचारत आज शिवसेनेने या मुद्यावरून टीकास्त्र सोडले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनामध्ये आज भाजपला पुन्हा लक्ष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, एखादे राज्य जेव्हा विकास किं वा प्रगतीचे मॉडेलअसल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. भूपेंद्र पटेल यांच्यावर आता गुजरातचा भार पडला आहे. वर्षभरात विधानसभांच्या निवडणुका आहेत. पटेल यांना पुढे करून नरेंद्र मोदी यांनाच लढावे लागणार आहे. गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच काय?, असा सवालही शिवसेनेनं विचारला आहे.
यात पुढे नमूद केले आहे की, रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा पुढच्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री नितीन पटेल, गोवर्धन जदाफिया, मनसुख मांडवीय, सी. आर. पाटील अशी अनेक नावे चर्चेत आणून मीडियातील चर्वण पद्धतशीर सुरू ठेवले. भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक करून मोदी यांनी या सर्व तथाकथित जवळच्या लोकांना अवाक् केले. ममी कोणाचा नाही, माझे कोणी नाहीफ हाच संदेश मोदी यांनी दिला आहे. पटेल २०१७ साली पहिल्यांदा आमदार झाले आणि आता थेट मंत्री. त्यांना प्रशासनाचा अनुभवही नाही. त्यामुळे ते सरकार, प्रशासन व पक्ष यांच्यात कसा समन्वय ठेवतात, याकडे सर्वांचे लक्ष राहील असे शिवसेनेने म्हटले आहे.