उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने तरूणीचा मृत्यू

मुंबई प्रतिनिधी | अर्धवट निद्रेत टुथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने दात घासल्यामुळे एका तरूणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धारावीत घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, धारावीत राहणारी १८ वर्षीय अफसाना खान शुक्रवारी सकाळी उठली आणि दात घासायला बाथरुममध्ये गेली. जिथे टूथपेस्टच्या बाजूला उंदीर मारण्याची विषारी पेस्ट ठेवली गेली होती. नकळत तिनं ब्रशला उंदीर मारायची पेस्ट लावली आणि ब्रश करू लागली, वास आणि चवीमुळे आपण उंदीर मारायची पेस्ट लावल्याचं जाणवलं तेव्हा तिनं लगेच तोंड धुतलं. मात्र तिला चक्कर आले. तिच्या घरच्यांनी अफसानाला जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. जेजे रुग्णालयात अफसानावर उपचार सुरु होते, मात्र उंदीर मारण्याच्या पेस्टमधील विष संपूर्ण शरीरात पसरलं होतं आणि तिचा मृत्यू झाला.

या सर्व प्रकाराने कुटुंबाला धक्का बसला आहे. नजरचुकीने घडलेल्या या प्रकाराने संपूर्ण कुटुंब हादरुन गेलं आहे. ंदराच्या औषधाने जिवंत माणसाचा घात केला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी धारावी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याआधी सुमारे दोन वर्षांपूर्वी कर्नाटकातही एका महिलेस याच प्रकारे प्राण गमवावे लागले होते.

Protected Content