काँग्रेस, राष्ट्रवादी की शिवसेना…खडसेंचा निर्णय लवकरच ?

khadse e1550572684596

जळगाव प्रतिनिधी । दिल्लीत शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आज माजी मंत्री एकनाथराव खडसे हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटणार आहेत. यामुळे आता ते नेमके कोणत्या पक्षात जाणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

भाजपचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे हे नाराज असल्याचे कधीपासूनच दिसून येत आहे. अलीकडच्या काळात त्यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतल्याचेही सर्वांनी पाहिले आहे. या पार्श्‍वभूमिवर, त्यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर ते आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटणार आहेत. यामुळे ते भाजपचा त्याग करण्याच्या मनस्थितीत दिसत असून याबाबत ते लवकरच निर्णय घेणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, एकनाथराव खडसे यांचे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये स्वागत होऊ शकते अशी स्थिती आहे. ते काँग्रेसमध्ये आल्यास जळगाव जिल्हा व पर्यायाने खान्देशमध्ये या पक्षाची स्थिती मजबूत होऊ शकते. तर राष्ट्रवादी व शिवसेनेची रावेर लोकसभा मतदारसंघात क्षीण शक्ती असून खडसे आल्यास त्यांना या मतदारसंघात लाभ होण्याची शक्यता आहे. अर्थात, स्वत: एकनाथराव खडसे हे नेमका कोणता निर्णय घेणार ? ते पक्षांतर करणार की भाजपमध्ये राहूनच आपल्या विरोधकांना जेरीस आणणार ? या प्रश्‍नांची उत्तरे लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

Protected Content