उन्मेषदादांवर भाजपमध्ये अन्यायाची शक्यता, त्यांनी घड्याळासोबत यावे ! : अनिल पाटील

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार उन्मेष पाटील यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होण्याची शक्यता असल्याने त्यांनी घड्याळासोबत यावे अशी जाहीर ‘ऑफर’ आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली असून राजकीय वर्तुळात याचीच चर्चा सुरू आहे.

खासदार उन्मेष पाटील यांची भारतीय जनता पक्षात कुचंबणा होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्‍वभूमिवर, अमळनेरातील कार्यक्रमात आमदार अनिल पाटील यांनी त्यांना जाहीर ‘ऑफर’ दिली. अमळनेरातील मंगळग्रह मंदिराला तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमातून निधी मिळाला असून याच्या मदतीने हेलीपॅडसह अन्य विकासकामांचे भूमिपुजन खासदार उन्मेष पाटील आणि आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात खासदार आणि आमदारांनी केलेली शाब्दीक टोलेबाजी चांगलीच लक्षवेधी ठरली. आमदार अनिल पाटील म्हणाले की, ”उन्मेष पाटील यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांनी घड्याळाच्या काट्यासोबत यावे. असे झाले तरच ते पुन्हा खासदार होऊ शकतील !” याला उत्तर देतांना खासदार उन्मेष पाटील यांनी ”सध्या घड्याळाचे काटे सध्या बरोबर फिरत नसून यासाठी अनिल पाटील यांनी मंगळग्रह मंदिराला साकडे घालावे” असे प्रत्युत्तर दिले. आपला पक्ष सक्षम असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. अर्थात, या राजकीय जुगलबंदीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेय हे सांगणे नकोच !

Protected Content